बेलेम - ब्राझिलमधील तुरुंगात सोमवारी दोन गटांत झालेल्या संघर्षात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. कारागृह प्रशाससनाने ही माहिती दिली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी बेलेमपासून साधारण ८५० किलोमीटरवर असणाऱ्या अल्टामीरा येथील तुरुंगात पाच तास हिंसाचार सुरु होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वेगवेगळ्या सरकारी तपास यंत्रणांनी संयुक्त प्रयत्न करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
ब्राझिलमधील तुरुंगात हिंसक संघर्ष, ५७ जणांचा मृत्यू - clash
या हिंसाचारात १६ जणांचे शीर कापून धडापासून वेगळे करण्यात आले. एका गटाकडून जेलमध्ये आग लावण्यात आल्याने गुदमरुन ४१ जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात १६ जणांचे शीर कापून धडापासून वेगळे करण्यात आले. एका गटाकडून जेलमध्ये आग लावण्यात आल्याने गुदमरुन ४१ जणांचा मृत्यू झाला. प्रतिस्पर्धी गट संपवण्याच्या हेतूने हा हल्ला करण्यात आला होता, अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हल्लेखोरांनी सेलमध्ये प्रवेश करत कैद्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर खोलीत आग लावली.
कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील एका कोपऱ्यात कैदी नाश्ता करण्यासाठी बसले असताना दुसऱ्या सेलमधून आलेल्या हल्लेखोरांनी जबरदस्ती घुसखोरी करत हल्ला केला. हल्ल्यादरम्यान दोघांना ओलीस ठेवण्यात आले होते. नंतर त्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. आणखी २ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्राझिलच्या कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या कारागृहांच्या क्षमतेपेक्षा जास्त असून हा सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.