वॉशिंग्टन :अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका तोंडावर आल्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जोई बिडेन हे दोघे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. यातच आता ओसामा बिन लादेनच्या पुतणीने ट्रम्प यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. ट्रम्प जर निवडून आले नाहीत, तर ९/११ प्रमाणे आणखी दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे मत तिने व्यक्त केले.
नूर बिन लादेन, ही ओसामा बिन लादेनचा मोठा भाऊ यसलाम बिन लादेन याची मुलगी आहे. ओसामा बिन लादेनच्या कुटुंबातील व्यक्ती आपल्या नावाचा उच्चार लादेन न करता, लादिन करतात. सध्या नूर ही स्वित्झर्लँडमध्ये राहते. "ओबामा-बिडेन यांच्या कार्यकाळात इसिसला चांगलेच पेव फुटले, आणि युरोपमध्ये त्याचा प्रसार झाला. ट्रम्प यांनी अशा दहशतवादी हल्ल्यांपासून अमेरिकेला सुरक्षित ठेवले आहे. ट्रम्प दहशतवादी हल्ला होण्याची वाट पाहत नाहीत, तर त्याआधीच ते दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळतात" असे नूर म्हणाली.