वॉश्गिंटन डी. सी -अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. यात जो बायडेन विमान शिडीच्या पायऱ्या चढतेवेळी तीनवेळा घसरल्याचा पाहयला मिळाले. सुदैवानं त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहिती व्हाइट हाउसकडून माध्यमांना देण्यात आली आहे.
जो बायडेन शुक्रवारी अटलांटाच्या दौऱ्यावर निघाले होते. ते आशियाई-अमेरिकी समुदायाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. एअरफोर्स वन या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या विशेष विमानाची शिडी ते चढत होते. यावेळी शिडीच्या पायऱ्या चढताना एक किंवा दोन नाही तर तब्बल तीन वेळा त्यांचा तोल गेला आहे. मात्र, त्यांनी स्व:ताला सावरले. पूर्ण पायऱ्या चढून होताच मागे वळून सलाम केला आणि विमानात जाऊन बसले.
जो बायडेन शिडी चढत होते. तेव्हा वारा जोरात सुरू होता. त्यामळे त्यांचा तोल गेला. मात्र, पूर्णतः स्वस्थ असून 100 टक्के ठिक आहेत, असे व्हाइट हाउसकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान अमेरिकेचे एअरफोर्स वन हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजलं जातं. एअरफोर्स वन हे अमेरिकेच्या सर्वोच्च लष्करी सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. बोईंग 747-200 बी सीरीज प्रकारातील हे विमान आहे. याच विमानाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल झाले होते.
यापूर्वीला पायाला दुखापत झाली होती -
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जो बायडेन यांचा कुत्र्यासोबत खेळताना पाय फ्रॅक्चर झाला होता. 'मेजर' नावाच्या कुत्र्यासोबत खेळत असताना, जो बायडन यांचा पाय मुरगळला आणि ते पडले होते. 78 वर्षांचे जो बायडन अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत.