न्यूयार्क - रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व देश उभे राहिले आहेत. रशियाचे हे पाऊल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) नियमांचे उल्लंघन आहे. संयुक्त सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडण्यात (UNSC vote on resolution on Russia) आला आहे. त्यावर मतदान झाले. यावेळी भारत आणि चीनने तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसून आले. युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करणाऱ्या संयुक्त सुरक्षा परिषदेत चीन आणि भारत हे दोन्ही देश मतदानापासून दूर राहिले.
मुत्सद्देगिरीचा मार्ग सोडून दिला ही खेदाची बाब आहे. आपण त्याकडे परतले पाहिजे. या सर्व कारणांमुळे, भारताने या ठरावावर अलिप्त राहणे पसंत केल्याचे युक्रेनवरील UNSC बैठकीत भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी म्हटलं. रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या या संपूर्ण घडामोडीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही थेट प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपली भूमिका मांडली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही आपल्या नागरिकांच्या रक्षणाची शपथ घेतली आहे. झेलेन्स्की यांनी रशियातील जनतेला त्यांच्या सरकारने सुरू केलेले युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, युक्रेनच्या संसदेने देशात आणीबाणी लागू केली आहे. त्याच वेळी, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी सर्व देशांना रशियावर कठोर निर्बंध लादण्याचे आणि युक्रेनला शस्त्रास्त्रे तसेच मानवतावादी आणि आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले आहे.