नवी दिल्ली - भारतीय बनावटीच्या 'कोव्हिशिल्ड' लसीचे २० लाख डोस आज (शनिवार) ब्राझीलमध्ये दाखल झाले. "मेड इन इंडिया कोरोना लस ब्राझीलमध्ये दाखल, असे ट्विट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले. शुक्रवारी विशेष विमानाने लस ब्राझीलला पाठविण्यात आली होती.
भारत सरकारचे मानले आभार -
कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधात्मक लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनीकडून तयार करण्यात आली आहे. तर भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये लसीचे उत्पादन सुरू आहे. ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील दुतावास कार्यालयाशी समन्वय साधून लस वाहतुकीची व्यवस्था केली. ब्राझीलचे राजदूत आँद्रे अर्न्हा यांनी लसीचा पुरवठा केल्याबद्दल सीरम कंपनीचे आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत. तसेच वाहतुकीवेळी सुत्रबद्ध नियोजन केल्यामुळे कंपनीचे कौतुक केले.