मुंबई -गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत रोज हजार ते दीड हजार रुग्णांची रोज भर पडत आहे. मुंबईत आणखी 903 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 77 हजार 197 वर पोहचली आहे. तर 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 4 हजार 554 वर गेला आहे. आतापार्यंत 44 हजार 170 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 28 हजार 473 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 57 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोनामुळे 93 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 36 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 57 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 93 मृत्यूपैकी 67 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 57 पुरुष आणि 36 महिला रुग्ण होत्या. मृतांमधील 11 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. तर 44 जणांचे वय 60 वर्षावर होते. तसेच 38 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. दरम्यान आज 625 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 44 हजार 170 वर पोहचला आहे.