जालना- नक्षलवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेले संदीप खर्डेंना शासकीय इतमामात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मूळचे आळंद (तालुका - देऊळगाव राजा, जिल्हा - बुलढाणा) येथील सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खर्डे या जवानाच्या काळजाचा तुकडा असलेल्या २ वर्ष वयाच्या नयना या मुलीचा ७ मे रोजी वाढदिवस होता.
हुतात्मा संदीप खर्डेंना साश्रू नयनांनी निरोप तसेच याच महिन्यात १२ मे रोजी लग्नाचा चौथा वाढदिवस होता, असे सुखाचे दिवस आणि आनंदाच्या क्षणाची जुळवाजुळव करत असतानाच संदीपला नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आले. चार वर्षांपूर्वी येथून जवळच असलेल्या अंढेरा या गावातील हरिभाऊ कायंदे यांच्या स्वाती नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता. पती-पत्नी दोघेही नागपूरला राहत असताना त्यांच्या या वेलीवर कन्यारत्न फुलले. त्यामुळे संदीप खूप आनंदी होता.
संदीपची सासरवाडी अंढेरा येथे औंढेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. या महादेवाच्या यात्रेची समाप्ती उद्या ४ मे रोजी होणार होती. त्यासाठीदेखील संदीपचा इकडे येण्याचा प्रयत्न सुरू होता. शिवाय मे महिना संदीपसाठी आनंदचा महिना होता. कारण ७ तारखेला त्याच्या चिमुकली नयनाचा तर, १२ तारखेला लग्नाचा चौथा वाढदिवस होता. या सर्व आनंदाच्या क्षणात सहभागी होण्याऐवजी संदीप आपल्या कुटुंबाला सोडून गेल्याचे दुःख या कुटुंबीयांवर कोसळले आहे.
संदीपच्या पश्चात त्याचा लहान भाऊ दीपक आई-वडील आणि पत्नी असा परिवार आहे. घराजवळच असलेल्या संदीपवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संदीपच्या काकांच्या खांद्यावर असलेल्या चिमुकल्या नयनाचा आवाज निघत नव्हता. मात्र, तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या अखंड धारा पाहून उपस्थितांचे ह्रदय पिळवटून टाकत होते.