पुणे - ज्या चांदीच्या रथातून जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करतो. त्याला चकाकी देण्याचे काम सुरू आहे. जातीपातीच्या भिंती ओलांडून मुस्लिम कारागीर काम करत आहेत. जातीच्या बेडीत अडकवू नका, असा संदेशच त्यांनी या माध्यमातून दिला आहे. 14 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) हे देहूत येणार आहेत. त्यापूर्वी चांदीच्या रथाला चकाकी देण्याचे काम सुरू आहे. उमर अख्तरसह इतर काही मुस्लिम कारागीर गेल्या सात वर्षांपासून अविरतपणे मोठ्या श्रद्धेने रथाला पॉलिश करण्याचे काम केले जाते आहे.
घनश्याम गोल्ड ज्वेलरीच्या माध्यमातून रथाला चकाकी देण्यात येत आहे. रथाला चकाकी आणण्यासाठी लिंबू वापरण्यात येत असल्याचे कारागिरांनी सांगितले आहे. यावर्षी पायी पालखी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यास मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे संत तुकाराम महाराजांची पालखी मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान होत होती. यावर्षी कोरोना आटोक्यात आला आहे, निर्बंध नाहीत. पालखी सोहळ्याची लगबग सुरू असून चांदीच्या पालखी रथाला चकाकी देण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम कारागीर मोठ्या श्रद्धेने रथाला पॉलिश करून चकाकी आणतात. त्यामुळे या पालखी सोहळ्यात हिंदू, मुस्लिम एकतेच दर्शन घडते.