नवी दिल्ली -देशातील कोरोनाचा प्रसार वाढत असून गेल्या 24 तासात उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. तब्बल 28 हजार 701 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 500 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 8 लाखाच्याही पुढे गेला आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 8 लाख 78 हजार 254 इतका झाला आहे. सध्या 3 लाख 1 हजार 609 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 53 हजार 471 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 23 हजार 174 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 10 हजार 289 मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या 2 लाख 54 हजार 427 वर गेली आहे. यातील एकूण 1 लाख 3 हजार 893 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 40 हजार 325 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 12 हजार 494 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर सर्वांत जास्त मृत्यू दिल्लीमध्ये झाले आहेत. दिल्लीत आतापर्यंत 3 हजार 371 जणांचा बळी गेला आहे. गुजरात राज्यात 41 हजार 820 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 38 हजार 470 कोरोनाबाधित तर 1 हजार 966 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.