मुंबई- भारतरत्न गाण सम्राज्ञी लता मंगेशकर यांची नुकतीच पहिली पुण्यतिथी पार पडली. यानिमित्त सर्वच स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लता मंगेशकर स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयेजन करण्यात आले होते. लतादीदी आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांना जवळून ओळखणाऱ्या अनेकांनी त्यांच्याबद्दल लिहून आठवणी जतन केल्या आहेत. सुमारे ५० हजार गाणी त्यांनी गायली होती. या सर्व गाण्यातून त्यांचा आवाज अमर झाला आहे. लतादीदी जेव्हा आपल्यातून निघून गेल्या तेव्हा टीव्हीवर त्यांची अंत्ययात्रा पहाताना लतादिदींबद्दल थोर व्यक्ती काय म्हणाल्या हे जाणून घेणारा प्रसाद मिरासदार यांनी लिहिलेला अनुभव विश्वाचे आर्त लतादीदी या ऑडिओ कथनाद्वारे स्टोरीटेल मराठीवर प्रकाशित झाला आहे. ही भावांजली हृद्य असून ती ऐकत राहावी अशी आहे.
फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आपल्या आवाजाने वा मंत्रमुग्ध स्वरांनी व्यापून टाकणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि नकळत टी व्ही लावला गेला. संपूर्ण भारतावर शोककळा पसरली होती. जग जणू काही काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटत होते. लतादिदींच्या स्वरातील गाणी एका मागोमाग एक लावली जात होती. मधूनच त्यांच्या सुहृदांच्या आठवणी जागवल्या जात होत्या. संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला तो स्वर असा सातत्याने ऐकताना एकच भाव मनात येत होता तो म्हणजे आर्तता..! लतादिदींच्या जाण्याने निर्माण झालेल्या दुःखासोबतच त्यांच्या स्वरांनी मनात जागृत झालेल्या करूणेचा अनुभव विलक्षण होता आणि ही करूणा सर्वांच्या मनात सातत्याने राहो हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा मनात येत होती. हा एक विलक्षण अनुभव होता.