मुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचे आज निधन झाले. गेले अनेक दिवस ते वार्ध्यक्याशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. ठाणे येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या विशीत सुरु झालेली त्यांची अभिनय कारकीर्द अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत झोकात सुरु होती. अखेरपर्यंत कलाविश्वाशी विशेषतः मराठी रंगभूमीशी प्रामाणिक राहिलेल्या अण्णांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
'वाचिक' अभिनयाचे पुरस्कर्ते मराठी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिकांसह आजच्या काळातील सुसंगत ओटीटी माध्यमांवरही जयंत सावरकर यांनी स्वतःच्या अभिनयगुणांची चुणूक दाखवली. स्पष्ट शब्दोच्चाराची देणगी लाभलेले जयंत सावरकर यांनी पाच तपांच्या अभिनय कारकिर्दीत सावरकर यांनी अपराध मीच केला, सौजन्याची ऐशी तैशी, सूर्याची पिल्ले, व्यक्ती आणि वल्ली अशी नाटके आणि अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला. 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये त्यांनी साकारलेला अंतू बरवा तर अविस्मरणीय! आपल्या अनोख्या वाचिक अभिनयाचा वस्तुपाठच जयंत सावरकर यांनी आपल्या शैलीदार अभिनयाने घालून दिला.
प्रत्येक माध्यमात सहज वावरजयंत सावरकर हेमराठी रंगभूमीवरचे नामवंत अभिनेता मामा पेंडसे यांचे जावई. 1954 साली, वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी चेहऱ्यावर रंग लावला तोच रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा दरारा निर्माण करण्यासाठी असे म्हटले तरी वावगे ठरु नये. त्यांची मराठी रंगभूमीवरची निष्ठा वादातीत होती. पण माध्यमांतर करतानाही त्या त्या माध्यमासाठी आवश्यक धाटणीचा अभिनय सावरकर यांनी लीलया केला. त्यांना अभिनयाचे कोणतेेही माध्यम वर्ज्य नव्हते. म्हणूनच तर उणीपुरी शंभर नाटके आणि चित्रपटांमधून अभिनय केल्यानंतरही 'समांतर' या सुहास शिरवळकर लिखित कादंबरीवर आधारीत त्याच नावाच्या वेब सीरीजमध्ये त्यांनी दमदार अभिनय करुन दाखवला.
अनेक पुरस्कार, सन्मानांचे मानकरीआपल्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत जयंत सावरकर हे अनेक पुरस्कार आणि सन्मानांचे मानकरी ठरले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा 'जीवनगौरव पुरस्कार', 97 व्या अ भा मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, विष्णूदास भावे पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, मास्टर नरेश पुरस्कार तसेच महाराष्ट्र सरकारतर्फे प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आदी बहुमान त्यांना लाभले.