मुंबई- बऱ्याचदा चित्रपट कलाकारांमध्ये अभिनयाव्यतिरिक्त इतरही गुण असतात. कुणी कविता करतं, कुणी चित्रं रेखाटतं, कुणी लिहितं, कुणी सुरेल गातं तर कुणी उत्तम वक्ता असतं. आजच्या घडीला अनेक सिनेकलाकार एकापेक्षा जास्त गोष्टींमध्ये रमताना दिसतात. अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद अथवा आवडीनिवडी ते इमानेइतबारे जोपासताना दिसतात. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वावरणारी सुंदर अभिनेत्री वैदेही परशुरामी देखील सूत्रसंचालनात आपले कसब दाखविताना दिसते. गेल्या वर्षी तिने पहिल्यांदाच छोट्या पडद्यावरील 'फू बाई फू' (सिझन ९) मध्ये कॉमपियरींग केले होते आणि ते सर्वांना आवडले होते. तिची बोलण्याची अदा आणि स्पर्धकांना आपलेसे करण्याचे कसब यामुळे ती 'फू बाई फू' च्या सेटवर सर्वात पॉप्युलर सेलिब्रिटी होती. अर्थात वैदेही ने कुठलेही नखरे दाखविले नाही आणि विनासायास शूटिंग पार पाडायची. आता 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' च्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करण्यासाठी वैदेही परशुरामीची वर्णी लागली आहे.
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ च्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या म्युझिकल कार्यक्रमाचे दुसरे पर्व येत आहे. आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन येत असून ते प्रेक्षकांना आपल्या जादुई आवाजाने बेधुंद करतील अशी ग्वाही निर्मात्यांनी दिली आहे. लहानग्यांच्या सुरांची मैफल आणि लाघवी आणि मधाळ बोलणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचे सूत्रसंचालन कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करणार असेही निर्मात्यांनी म्हटले आहे.
वैदेही परशुरामी व्यक्त होत म्हणाली की, 'सूत्रसंचालन वाटते तितके सोप्पे काम नाहीये. तुम्हाला सतत जागरूक राहावे लागते आणि प्रसंगानुरूप बोलावे लागते. स्क्रिप्ट जरी असले तरी.बऱ्याचदा उस्फूर्तपणे बोलावे लागते. तसेच स्पर्धक आणि जजेस यांना बोलते करणं हेही महत्त्वाचे असते. सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी सांगायचं की मी माझी भूमिका छानपणे निभवते. खरंतर गेल्या वर्षी मी माझ्या एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने छोटे उस्ताद च्या पहिल्या पर्वात आले होते. यातील स्पर्धकांची प्रतिभा मला खूप भावली. या लहान उस्तादांचे प्रेझेंटेशन अप्रतिम होते. मनातून वाटत होतं की आपणही या टॅलेंट च्या सहवासात राहावं. कदाचित देवाने माझे मन ओळखले असावे म्हणूनच 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' च्या निर्मात्यांनी मला दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करण्यासाठी आमंत्रित केले. मी हे नक्की सांगू शकेन की इथे अवाक करणारं टॅलेंट आहे.'