मुंबई - 'नवा गडी नवं राज्य'मध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमं केलं आणि ते नाटक खूप चाललं. नाटकांच्या प्रयोगांदरम्यान उमेश कामत आणि प्रिया बापट यांचे सुत जुळले आणि त्यांनी प्रेमविवाह केला. अर्थात त्यानंतर दोघांचीही नवी इनिंग सुरू झाली आणि दोघेही आपापल्या करियरमध्ये बिझी झाले. उमेशने मराठीत नाटकं, मालिका, चित्रपट केले तसेच प्रियानेही अभिनयक्षेत्रात यश मिळविले. मराठीबरोबरच तिने हिंदीमध्येसुद्धा काम केले आणि तिची हिंदी वेब सिरीज सिटी ऑफ ड्रिमस् खूप गाजली आणि तिचा नुकताच तिसरा सिझन प्रदर्शित झालाय. मराठीमध्ये उमेश आणि प्रियाने एकत्र 'आणि काय हवं?' ही वेब मालिका केली जी खूप गाजली. त्यांची भन्नाट केमिस्ट्री बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते आणि आता हे क्युट कपल पुन्हा एकदा एकत्रितपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे.
मध्यंतरीच्या काळात उमेश कामत अभिनित 'दादा एक गुड न्युज आहे' हे नाटक रंगभूमीवर आले आणि तुफान चालले किंबहुना अजूनही खूप चालत आहे. त्या नायकाची निर्मिती प्रिया बापटने केली होती. आता प्रिया एका नवीन नाटकाची निर्मिती करीत आहे ज्याचे नाव आहे 'जर तर ची गोष्ट'. महत्वाचं म्हणजे या नाटकात प्रिया बापट आणि उमेश कामत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. रंगभूमीवर ते तब्बल दहा वर्षांनंतर एकत्र काम करताना दिसतील. प्रिया बापट सादर करत असलेल्या, सोनल प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे. इरावती कर्णिक यांनी हे नाटक लिहिले असून नंदू कदम निर्माते आहेत. उमेश कामत आणि प्रिया बापट सोबत या नाटकात आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसतील.
'मला माझे दुसरे व्यावसायिक नाटकही उमेश सोबतच करायचे होते म्हणून एकत्र काम करण्यासाठी योग्य संहितेच्या प्रतीक्षेत होते. उमेश माझा अत्यंत लाडका को-स्टार आहे, त्यामुळे माझा हट्ट होता की माझ्या नाटकात तोच हवा. उत्तम संहिता हाती लागली असून उत्तम टीमसोबत आम्ही 'जर तर ची गोष्ट' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत,' प्रिया व्यक्त होत म्हणाली. उमेशने सांगितले की, 'व्यावसायिकदृष्ट्या माझं पहिलं प्रेम नाटक असून माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम म्हणजे प्रिया सोबत रंगमंचावर काम करायला मिळतंय याबद्दल मी खूप आनंदी आहे. नाटक, चित्रपट, वेब सिरीज आदी आम्ही एकत्र केलेली असून आता नव्या दमाने हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत याचा आनंद आहे.'