महाराष्ट्र

maharashtra

‘सुमी आणि आम्ही’ मध्ये दिसणार मोहन जोशी आणि सविता मालपेकर यांच्यातील ‘अभिनय जुगलबंदी’!

By

Published : Apr 18, 2023, 8:28 PM IST

जेष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर. हे दोन दिग्गज कलाकार ‘सुमी आणि आम्ही’ या नाटकातून एकत्र येत असून त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ही दिग्गज कलावंतांची जोडी पुन्हा एकत्र येत असून ती नाट्यप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - मराठी मनोरंजनसृष्टीत चित्रपट आणि मालिका यातून झटपट प्रसिद्धी मिळत असली तशी अभिनय घोटून घेण्यासाठी बहुतांश कलाकार नाटकांकडे वळतात. अर्थात मनोरंजनसृष्टीत प्रथितयश कलाकार मानले जातात त्या सर्वांनीच अभिनयाची सुरुवात रंगमंचावरून केलेली आहे. तसेच नाटक हे मराठी माणसाचे वेड आहे. अशी कितीतरी कुटुंब आहेत ज्यांच्या मनोरंजनाच्या बजेट मध्ये नाटकांना प्राधान्य दिलं जातं. छोटा पडदा असो अथवा मोठा पडदा, जर कलाकाराने रंगभूमीवर काम केले नसेल तर तो स्वतःला अपूर्ण मानतो. त्यातील बरेच कलाकार नाटकांकडे वळलेले दिसतात आणि नाट्यनिर्मात्यांनाही त्या कलाकारांच्या पॉप्युलॅरीटीचा तिकीट बुकिंग साठी उपयोग होतो. अनेक जेष्ठ कलाकारांना नाटक जास्त प्रिय असल्याचे दिसून येते. याच ताजं उदाहरण म्हणजे जेष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर हे दोन दिग्गज कलाकार ‘सुमी आणि आम्ही’ या नाटकातून एकत्र येत असून त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ही दिग्गज कलावंतांची जोडी पुन्हा एकत्र येत असून ती नाट्यप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी ‘गाढवाचं लग्न' या लोकनाट्याने मराठी प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले होतं. या वगनाट्याला अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अदाकारीनं चार चांद लागले होते. त्यांचे अफलातून कॉमेडी टाईमिंग आणि जबरदस्त देहाभिनयाने रंगमंचावर धुमाकूळ घातला जायचा. आता ते जरी ‘सुमी आणि आम्ही’ या सामाजिक नाटकातून एकत्र येत असले तरी ते प्रेक्षकांच्या मनोरंजनात कसूर करणार नाहीत अशी ग्वाही दोघेही दिग्गज कलाकार देतात. त्यांची विनोदावरील पकड प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करेल यात शंका नाही. राजन मोहाडीकर यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले आहे. पुरुषोत्तम बेर्डे यांनी नेहमीच मनोरंजित करणारी नाटके प्रेक्षकांना दिली आहेत आणि त्यांच्याकडे हे दोन दिग्गज कलाकार असल्यामुळे त्यांचे काम थोडे सोप्पे झाले असे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी हे तिघे रंगभूमीवर परतलेले दिसणार आहेत. अभिनयातील परिपक्वता आणि दिग्दर्शनातील सहजता यांचा सुरेख मिलाफ या नाटकातून बघायला मिळेल असे निर्माते सांगतात.

आपल्या भूमिकेविषयी मोहन जोशी म्हणाले की, 'गेली अनेक वर्षे मी रंगभूमीवर कार्यरत आहे. ‘सुमी आणि आम्ही’ या नाटकात मी आनंद धडफळे ही व्यक्तीरेखा साकारतोय. पुरुषोत्त्तम बेर्डे दिग्दर्शित आणि राजन मोहाडीकर लिखित या नाटकात काम करायला मिळतंय ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सविता मालपेकर सोबत पुन्हा एकदा रंगमंचावर धमाल करायला मिळणार हेही आनंददायी आहे. राजन मोहाडीकर हा माझा जवळचा मित्र आहे आणि त्याच्या लिखाणाबद्दल मला माहिती आहे. हे नाटक एक उत्तम सकस नाटयकृती असणार याबद्दल दुमत नसेल. अर्थात त्यांच्यामुळे मी हे नाटक करायला होकार दिला.'

सविता मालपेकर यांनी सांगितलं की, ‘मी जवळपास एका तपानंतर म्हणजेच १२ वर्षांनी नाटकात काम करतेय. ‘सुमी आणि आम्ही’ मध्ये मी मेधा धडफळे ही व्यक्तीरेखा साकारत आहे. अभिनयातील धकाधकीच्या जीवनात असे नाटक ऑफर होणे हे माझे भाग्य आहे. त्यातही पुरुषोत्तम बेर्डे आणि मोहन जोशी सारख्या दिग्गज लोकांबरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळतेय हा दुग्धशर्करा योग आहे. या माझ्या आवडत्या लोकांसोबत नाटक करण्याची संधी मी कशी दवडू शकेन?'

‘सुमी आणि आम्ही’ या कौटुंबिक नाटकाची निर्मिती केली आहे निर्माते राजस संजय गोडसे आणि शैलेश राजे यांनी राजस प्रॉडक्शन्स आणि मायबोली चित्र या बॅनरखाली. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना असून सुनील महाजन व संदीप विचारे सूत्रधार आहेत. या दोन अंकी नाटकात मोहन जोशी, सविता मालपेकर, श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत यांच्या भूमिका आहेत.

‘सुमी आणि आम्ही’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या २२ एप्रिलला होणार आहे.

हेही वाचा -Sara Ali Khan : सारा अली खानने लिलाक बिकिनीमध्ये पोहतानाचे फोटो केले शेअर...

ABOUT THE AUTHOR

...view details