मुंबई - Maharashtracha Foveate Kon awards : सध्या महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळी सुरु असून प्रत्येक नेता मीच महाराष्ट्रातील जनतेचा फेवरेट आहे असे सांगताना दिसतोय. त्या प्लॅटफॉर्मवर जरी मनोरंजन होत असले तरी जनता आपल्या रुटीनमध्ये मग्न असून सिनेमा, मालिका आणि नाटकं यातूनच मनोरंजित होताना दिसतेय. झी मराठी वाहिनीतर्फे 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हे पुरस्कार रसिकांच्या वोटिंग वरून निवडले जातात. सालाबादप्रमाणे यावर्षीही 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' पुरस्कारांचे वेध रसिक आणि सेलिब्रिटीज यांना लागले असून त्यांची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत.
समीक्षक पसंती पुरस्काराचा समावेश - महाराष्ट्राचा फेवरेट कोण? 2024 मध्ये यावेळी एक नवा पुरस्कार देण्यात येणार असून समीक्षक पसंती पुरस्कार हा विभाग यंदा नव्याने समाविष्ट केला आहे. यामध्ये फेवरेट लेखक म्हणून निखील महाजन आणि प्राजक्त देशमुख यांना 'गोदावरी' चित्रपटासाठी नामांकन मिळाले आहे तर परेश मोकाशी यांना 'आत्मपॅम्प्लेट'साठी नामांकित करण्यात आलंय. सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर यांची 'तेंडल्या'साठी निवड झाली आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांची 'वाळवी' चित्रपटाच्या लेखनासाठी निवड झाली आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी आणि नागराज मुंजुळे यांना 'नाळ 2' च्या लेखनासाठी समीक्षकांच्या पसंती पुरस्कारासाठी नामांकनाच्या यादीत निवडले आहे. तर सुनिल सुकथनकर यांना 'श्यामची आई' चित्रपटाच्या लेखनासाठी या यादीत नामांकित करण्यात आलंय.
मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हे पुरस्कार प्रेक्षकांच्या निवडीवर अवलंबून असतात. प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनंतर या जाहीर झालेल्या नावांमधून ‘महाराष्ट्राचा फेवरेट’ निवडले जाणार असून त्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत.