मुंबई - रिअॅलिटी टेलिव्हिजन अभिनेत्री आणि ड्रामा क्विन राखी सावंतचा प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत विवाह झाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मात्र, हा विवाह नक्की झालाय का नाही यावर सोशल मीडियात संशय व्यक्त केला जात होता. अखेर सोमवारी आदिल खानने लग्न अधिकृत असल्याचा खुलासा केला आहे. राखी सावंतने सार्वजनिक ठिकाणी हौशी फोटोग्राफर्स समोर रडण्याचा ड्रामा केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते, त्यापार्श्वभूमीवर आदिलचा हा खुलासा आला आहे.
इंस्टाग्रामवर आदिलने एक फोटो शेअर केला ज्यात त्याने कॅप्शन दिले की, 'अखेर इथे फायनल घोषणा करत आहे. राखी मी तुझ्याशी लग्न केले नाही असे कधीच म्हणालो नव्हतो. काही गोष्टी हाताळायच्या असल्याने मी शांत होतो, आपल्याला लग्नाच्या शुभेच्छा राखी ( पप्पुडी ).'
अलीकडेच, राखीने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली की तिने 2022 मध्ये आदिलशी लग्न केले होते. तिने त्यांच्या कथित विवाह प्रमाणपत्राचा एक फोटो देखील शेअर केला होता ज्यामध्ये हे लग्न गेल्या वर्षी 29 मे रोजी झाले होते. राखीने तिच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर फोडल्यापासून, आदिलने राखीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याचा दावा करत अनेक बातम्या समोर आल्या. या दोघांचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.