मुंबई- SRK dance on Jhoome jo pathaan : शाहरुख खान 2 नोव्हेंबरला 58 वा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झाला. किंग खानने वाढदिवस साजरा करण्यासाठी एका चाहत्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्याच्या उपस्थितीनं चाहत्यांमध्ये उत्साहाचं वारं संचारलं होतं. यावेळी शाहरुखनं त्याच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'पठाण' आणि 'जवान' चित्रपटातील 'झूम जो पठान' आणि 'नॉट रमैया वस्तावैय्या' या गाण्यांवर नृत्य केलं. शाहरुखचा हा डान्स पाहून चाहत्यांचा उत्साह दुणावला आहे.
याबद्दल शाहरुखने चाहत्यांचे आभार मानले आहेत. शाहरुखनं वाढदिवसानिमित्त चाहत्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर नेहमीप्रमाणेच त्यानं आपल्या मजेशीर उत्तरांनी आणि अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली. शाहरुखनं त्याचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिलं, 'तुम्हा सर्वांसोबत बर्थडे सेलिब्रेट करणं नेहमीच खास असतं, माझा दिवस खास बनवल्याबद्दल धन्यवाद'.
शाहरुख खान फॅन इव्हेंटमध्ये 'डिंकी' चित्रपटाबद्दल बोलला. 'डिंकी'चे निर्माते राजकुमार हिरानी आणि लेखक अभिजात जोशी हेही त्यांच्यासोबत होते. 'डंकी' ड्रॉप 1 टीझरबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला, 'अडीच वर्षांपासून आम्ही 'डंकी' बनवत आहोत आणि आज ड्रॉप 1 ची पहिली झलक आहे. ड्रॉप 2 देखील लवकरच प्रदर्शित होईल.
'डिंकी' चित्रपट हा जिओ स्टुडिओज, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिराणी फिल्म्स यांच्या सहयोगानं बनवण्यात आलाय. पठाण आणि जवान या शाहरुखच्या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळालं. त्यानंतर 'डंकी'च्या रिलीजची प्रतीक्षा चाहत्यांनी सुरू केलीय. शाहरुखच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरल्याचं पाहायला मिळालं. 'डंकी'चा टीझर प्रेक्षकांना आवडल्याचं प्रेक्षकांच्या प्रतिक्रियावरुन दिसत आहे. राजकुमार हिराणी यांनी बनवलेले यापूर्वीचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले होते. 'जवान' चित्रपटासाठीही शाहरुखनं दिग्दर्शक अॅटलीसोबत पहिल्यांदाच काम केलं होतं. हा चित्रपट हिट होण्यामागे अॅटलीचं कौशल्य होतं हे सर्वमान्य आहे. कारण त्यानंही आजवर निर्मित केलेले सर्व चित्रपट सुपरहिट ठरलेत. राजकुमार हिराणीसोबतचा 'डंकी' सुपरहिट होणार असल्याची खात्री शाहरुखसंह निर्मात्यांच्या टीमला वाटतेय. 'डंकी'ची निर्मिती राजकुमार हिराणी आणि गौरी खान यांनी केली आहे. अभिजात जोशी, राजकुमार हिराणी आणि कनिका धिल्लन यांनी या चित्रपटाचं लेखन केले आहे. 'डिंकी' हा बहुप्रतीक्षित चित्रपट 22 डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे.