मुंबई- शाहरुख खानने भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक उल्लेखनीय मैलाचा दगड गाठला आहे. एकाच कॅलेंडर वर्षात 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारे दोन सुपरहिट चित्रपट त्याच्या नावावर नोंद झाले आहेत. 'पठाण' आणि 'जवान' या त्याच्या यावर्षी रिलीज झालेल्या दोन चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कमाईनं ही किमया साधली आहे. यामुळे तो आता निर्विवादपणे भारतीय बॉक्स ऑफिसचा किंग खान बनला आहे. अजूनही त्याचा जवान चित्रपट थिएटरमध्ये धुमाकुळ घालत असून त्याचे चाहते चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाचा आनंद साजरा करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. गेल्या दोन दशकापासून अबाधित असलेली शाहरुखची किंग खान ही प्रतिमा गेल्या चार वर्षापासून धुसर बनली होती. पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत त्यानं आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलंय.
अलीकडेच सुपरस्टार शाहरुखनं ट्विटरवर एक डाय हार्ड फॅनचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये या चाहत्यानं जवान मधील शाहरुखचं यश साजरं करण्यासाठी स्वतःच्या पाठीवर शाहरुख खानच्या चेहऱ्याचा टॅटू काढला होता. त्याला प्रत्युत्तरादाखल थँक यू म्हणत फार दुखलं तर नाही ना, असे म्हणत त्याची विचारपूस केली होती.
शाहरुख खानचा त्याच्या चाहत्यांशी असलेला खरा खुरा संबंध हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. तो #AskSrk हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नियमितपणे चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. यावर त्याच्या मिश्कील आणि हजरजबाबीपणाचा प्रत्यय चाहत्यांना नेहमी येतो.
22 सप्टेंबर 2023 रोजी अशाच एका सत्रादरम्यान, एका चाहत्याने शाहरुख खानला त्याच्या मन्नत बंगल्यासमोर उभे असलेला फोटो शेअर करण्याची विनंती केली होती. यावर मिश्किल उत्तर देताना त्यानं लिहिलं होतं की, 'अरे बाबा मी घरात बसून नाही कामाला लागलोय. ठीक आहे ना...' पठाण आणि जवान या दोन चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान राजकुमार हिरानी दिग्दर्शित आगामी डंकी या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहतोय. या बहुप्रतीक्षित चित्रपटात तापसी पन्नू देखील आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या काळात रुपेरी पडद्यावर दाखल होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाची प्रभास स्टारर 'सालार: भाग 1' या मोठ्या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.