मुंबई- बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादववर सापांच्या विषाची तस्करी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. त्याच्यावर आरोप आहे की, राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडा औद्योगिक परिसरात विषारी साप आणि ड्रग्सचा तो व्यापार करतो आणि रेव्ह पार्ट्याही आयोजित करतो. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आलाय. एल्विश यादवची ही बातमी सोशल मीडियावर आणि देशभरात वाऱ्यासारखी पसरलीय.
आता स्वत: एल्विश यादवने आपल्यावरील या गंभीर आरोपांचे खंडन करण्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडिओ तातडीने जारी केला आहे. 3 नोव्हेंबर रोजी एल्विशने त्याच्या इंस्टाग्राम आणि एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणताना दिसतोय की, त्याच्यावर लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत आणि तो तपासासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे. या आरोपांवर एल्विश यांनी आपले संपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. जाणून घ्या काय म्हणतोय एल्विश यादव...
कृपया माझे नाव खराब करू नका, एल्विश यादवची मीडियाला विनंती - एल्विशने त्याच्या इंस्टाग्राम आणि एक्स हँडलवर एक व्हिडिओ जारी करून या गंभीर आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय. या व्हिडीओमध्ये एल्विश म्हणतोय, 'हॅलो दोस्तहो, मी पाहिलं की माझ्या विरोधात कसल्या बातम्या येत आहेत, एल्विश यादवसोबत असं घडलं, त्याला असं पकडलं, या सगळ्या गोष्टी माझ्याविरोधात पसरवल्या जात आहे. जे काही आरोप आहे ते निराधार आहेत, साफ खोटे आहेत. त्यात जरासेही तथ्य नाही.'