मुंबई - Maa Tujhe Salaam on Dubai street : संगीतकार ए.आर. रहमान दुबईमध्ये एका डायहार्ड चाहतीला भेटला तेव्हा त्यानं एक हृदयस्पर्शी अनुभव घेतला. रहमान जात असलेल्या कार जवळ एक मुलगी आली आणि तिने त्याच्यासाठी गायन करण्याची इच्छा बोलून दाखवली. या अनाहुत पाहुणीने दिलेल्या ऑफरमुळे रहमान चकित झाला आणि तिला गायन करण्यास सांगितले. खुद्द रहमानने तिचा सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये, फ्रेंच इंडोनेशियन चाहती असलेली सेलिनेडी माताहारीने रहमानचे कौतुक केले आणि तिने त्याचा फॅन असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिने गाणे सादर करण्याची परवानगी मागितली. रहमानने दयाळूपणे सहमती दर्शवली. सेलिनेडीने एआर रहमानचे सुप्रसिद्ध देशभक्तीपर गाणे 'मां तुझे सलाम'चे गायन करुन तिच्या संगीत प्रतिभेचे प्रदर्शन केले. ती गात असताना सुंदर गिटारही वाजवत होती.
कारमध्ये बसलेल्या एआर रहानला तिचे गाणे, गिटार वाजवणे पसंत आल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. रहमानने त्याच्या सेल फोनवर सेलिनेडीचा उत्स्फूर्त परफॉर्मन्स रेकॉर्ड केला. नंतर, त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर हा हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला. यामुळे चाहत्यांना कुशल संगीतकार असलेल्या रहमान आणि त्याचे समर्पित अनुयायी यांच्यातील संगीताची सुंदर देवाणघेवाण पाहण्याची संधी मिळाली.