नवी दिल्ली - Vishals allegations against CBFC : तमिळ अभिनेता आणि निर्माता विशालने केंद्रीय सेन्सॉर बोर्डातील काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, सरकार भ्रष्टाचाराबद्दल सजग असून अशा गोष्टी खपवून घेणार नाही. तमिळ अभिनेता विशालने 6.5 लाख रुपयांची लाच दिल्याच्या दाव्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याच्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळवत असताना त्याच्याकडे लाच मागण्यात आल्याचा आरोप विशालने केला होता.
'सीबीएफसी मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा अभिनेता विशालने पुढे आणला, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारची भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलता आहे आणि यामध्ये कोणीही गुंतलेले आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. मंत्रालयाने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटलंय की, 'माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी आजच मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. jsfilms.inb@nic.in या वेब साईटवर सीबीएफसीकडून छळवणुकीच्या इतर कोणत्याही घटनांबद्दल माहिती देऊन मंत्रालयाला सहकार्य करण्याची आम्ही प्रत्येकाला विनंती करतो', असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
सीबीएफसीचे माजी सदस्य असलेले चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एएनआयला सांगितले की, '... त्याने आपल्या वक्तव्यात दोन नावं घेतली आहेत, एम राजन आणि जिजा रामदास. माझ्या माहितीनुसार हे दोघेही केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे कर्मचारी नाहीत. .. त्यामुळे या टप्प्यावर सीबीएफसी अधिकाऱ्यावर आरोप करणं योग्य नाही... पण जर आरोप होत असतील तर आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करतो कारण हे आरोप खूप गंभीर आहेत...लाच मागणारा अधिकारी त्याच्या थेट खात्यात पैसे घेणार हे उघड आहे. विशालनं नाव दिलेल्या या दोन लोकांना विचारले पाहिजे की त्यांनी सीबीएफसीमधून कोणाच्या तरी वतीने पैसे घेतले आहेत का... या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी झाली पाहीजे.'