मुंबई - ज्येष्ठ अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर हृदयविकाराशी संबंधित आजारावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना उपचारासाठी लखनऊमध्ये हलवण्यात आले होते.
जावयांनी सोशल मीडियावरुन दिला बातमीला दुजोरा - मिथिलेश चतुर्वेदी यांच्या मृत्यूच्या बातमीला त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर दुजोरा दिला आहे. आशिष चतुर्वेदी यांनी मिथिलेश यांचे फोटो फेसबुकवर शेअर करत लिहिले की, "तुम्ही जगातील सर्वोत्तम पिता होतात, तुम्ही मला जावयासारखे नव्हे तर मुलासारखे प्रेम दिलेत, तुमच्या आत्म्याला शांती लाभो."
मिथिलेश चतुर्वेदी यांचा अभिनय प्रवास - मिथिलेश चतुर्वेदींच्या निधनाची बातमी आल्यानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासात सलमान खान, शाहरुख खान आणि हृतिक रोशन सारख्या ए श्रेणीच्या कलाकारांसोबत अनेक मोठ्या आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी सनी देओलचा 'गदर: एक प्रेम कथा', मनोज बाजपेयींची भूमिका असलेल्या 'सत्या', शाहरुख खान स्टारर 'अशोका' यासह 'ताल', अभिषेक बच्चनचा 'बंटी और बबली', हृतिक रोशनचा 'क्रिश' आणि सलमान खानचा 'रेडी' या चित्रपटात काम केले आहे. पण त्याला सर्वाधिक ओळख ऋतिक रोशनच्या 'कोई... मिल गया' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात त्यांनी हृतिक रोशनच्या कंप्यूटर शिक्षकाची भूमिका साकारली होती.
'स्कॅम 1992'मधून डिजीटल पदार्पण - मिथिलेश चतुर्वेदी यांनी 1997 मध्ये रिलीज झालेल्या 'भाई भाई' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला प्रवास सुरू केला होता. यानंतर त्यांनी सत्ता, ताल, फिजा, रोड, कोई मिल गया, गांधी माय फादर आणि बंटी बबली या चित्रपटांमध्ये काम केले. आपण त्यांच्या डिजिटल पदार्पणाबद्दल बोलायचे तर मिथिलेश यांनी 2020 मध्ये प्रसिद्ध वेब सीरिज 'स्कॅम 1992' द्वारे ओटीटीच्या जगात पदार्पण केले होते. या सर्वांशिवाय ते नाट्यक्षेत्रातही सक्रिय अभिनेता होते.
हेही वाचा -गायक किशोर कुमार यांची आज 93 वी जयंती; चाहत्यांनी मंदिर, संग्रहालय बनवून आठवणींना ठेवलंय जिवंत