मुंबई- Tiger vs Pathaan : बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांनी टायगर व्हर्सेस पठाण या चित्रपटाच्या स्क्रिप्टला मान्यता दिली आहे. या चित्रपटाचं कथाकथन स्वतः यशराज फिल्म्सचा निर्माता आदित्य चोप्रा यांनी होस्ट केले होते. यापूर्वीच टायगर व्हर्सेस पठाण चित्रपटाची स्क्रिप्ट एक महिन्यापूर्वी शाहरुख खान आणि सलमान खान यांना स्वतंत्रपणे सादर करण्यात आली होती. दोन्ही कलाकारांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे चित्रपटाचे पुढील काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनची तयारी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार असून पुढील वर्षी मार्चमध्ये प्रत्यक्ष शूटिंगला सुरूवात होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार भव्य चित्रपटात पूर्ण क्षमतेनं एकत्र येणार असल्यामुळे सर्वांच्याच नजरा या प्रोजेक्टकडे लागल्या आहेत. यशराज फिल्म्सचे गुप्तहेर विश्व या दोन दिग्गज स्टार्सना एकत्र बांधून ठेवणार आहे.
शाहरुख खान आणि सलमान खान यांनी स्क्रिप्टला होकार दिला. निर्माता आदित्य चोप्राने पुढाकार घेऊन शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या आणि त्या दरम्यान त्यांना चित्रपटाची कथा ऐकवली. दोन्ही सुपरस्टार स्क्रिप्टवर पूर्णपणे प्रभावित झाले आणि त्यांनी या प्रकल्पाला उत्साहाने स्वीकारले. सुपरस्टार्सची मान्यता मिळाल्याने, चित्रपट आता मार्चमध्ये निर्मितीला सुरुवात करणार आहे.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, टायगर व्हर्सेस पठाण हा यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. एक था टायगर आणि टायगर जिंदा है पासून सुरू झालेला, सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा प्रवास यशस्वी टायगर फ्रँचायझीसह या सिनेमॅटिक गुप्तहेर विश्वाची सुरुवात झाली. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ आणि पठाण, शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेल्या अॅक्शन-पॅक फिल्म वॉरने हे विश्व आणखी विस्तारले आहे.