मुंबई- शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम अभिनित आणि सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण यावर्षी बॉक्स ऑफिसवर राज्य करणारा एकमेव चित्रपट ठरला आहे. त्याने 130 दशलक्ष युएस डॉलर्स कमावत कमाईत बाहुबलीलाही मागे टाकले आहे. नुकतेच या चित्रपटाने सिनेमागृहांत १०० दिवस पूर्ण केले. पहिला विकेंड च्या कलेक्शनवर अथवा एक दोन आठवडे चित्रपट चालला तर हल्ली तो हिट अथवा फ्लॉप ठरतो. त्यामुळे पठाण चे हे यश चित्रपटसृष्टीसाठी नेत्रदीपक आहे. अर्थात या चित्रपटाच्या यशामुळे शाहरुख चे चाहते खुश झाले असले तरी सिनेसृष्टीत सिद्धार्थ आनंद यांची दिग्दर्शक म्हणून पत वाढली आहे. सिद्धार्थ आनंद कौतुकास पात्र आहे कारण जवळपास सर्व चित्रपट तिकीटबारीवर कोसळत असताना त्यांनी एक सुपरहिट चित्रपट दिला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी प्रेक्षकांना थिएटर मध्ये येण्यासाठी उद्युक्त केलं.
याआधी वॉर सारखा ॲक्शन चित्रपट त्यांनी बनविला होता जो सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. आता पठाण, जो सिनेमाच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वात मोठा जागतिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे, हा चित्रपट सुद्धा उत्तम कमाई करणारा चित्रपट ठरल्याने त्यांची फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉलर टाईट झाली आहे. सध्या हिंदी चित्रपटात प्रतिष्ठित ५०० कोटी नेट कलेक्शन क्लबमध्ये केवळ दोन दिग्दर्शक आहेत आणि ते म्हणजे सिद्धार्थ आनंद आणि एस एस राजामौली.