मुंबई - भारतामध्ये लोकसंख्या वाढीमुळे, आता तर आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश झालोय. नोकऱ्या आणि नोकरी शोधणारे यांच्यातील प्रमाण व्यस्त आहे. आयुष्यात स्थिरता आणण्यासाठी ९०% लोकांना नोकरीची गरज असते. परंतु प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करण्यापेक्षा सरकारी नोकरी मिळविण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु तेथे इतकी मोठी स्पर्धा असते की बऱ्याच जणांना माहीत नसते की त्यासाठी असलेल्या स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जायचे. परंतु अनेक मार्गदर्शक क्लासेस उपलब्ध असतात ज्यांचा फायदा प्रत्येकाला घेता येत नाही.
एमपीएससी परीक्षेत मुसंडी मारणे आवश्यक- शासकीय जॉब्ससाठी एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा असतात. परंतु त्यात हमखास यश मिळवण्याचा फॉर्म्युला किंवा पॅटर्न नसतो. मेहनतीला पर्याय नाही म्हणतात, ते या परीक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थी नकीच जाणतात. तीव्र इच्छाशक्ती असणे गरजेचे असते आणि त्याच्या पूर्ततेसाठी अथक मेहनत घेणे त्याहूनही महत्त्वाचे असते. आणि यासाठी मुसंडी मारणे अधिक गरजेचे असते. मुसंडीवरून आठवले की 'मुसंडी' नावाचा चित्रपट येऊ घातला आहे आणि त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातून वरील विषयाला हात घातला असून फक्त यशस्वी होण्यासाठी नव्हे तर या स्पर्धेत अपयश आलेल्या मुलांना ते कसे पाचवायचे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. अर्थात हा चित्रपट डोळ्यात अंजन घालीत मनोरंजन सुद्धा करेल अशी ग्वाही दिग्दर्शक देतात.