मुंबई -Dhak Dhak Movie : तापसी पन्नू इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं आपल्या अभिनय कौशल्यानं नेहमीच सर्वांवर छाप सोडली आहे. दरम्यान आता ती निर्माता बनली आहे. तिचे प्रोडक्शन हाऊस आऊटसाइडर्स फिल्म्स 'धक धक' नावाचा चित्रपट रिलीज करण्याच्या तयारी करत आहे. या चित्रपटामध्ये फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा आणि संजना सांघी हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. एका एंटरटेनमेंट पोर्टलनुसार 'धक धक' 13 ऑक्टोबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटाकडून तापसीला खूप अपेक्षा आहे. या चित्रपटाद्वारे ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.
'धक धक' लवकरच होणार चित्रपटगृहांमध्ये दाखल : तापसी पन्नूच्या आउटसाइडर्स फिल्म्सनं हा चित्रपट वायाकॉम 18 स्टुडिओ आणि बीएलएम (BLM)पिक्चर्सच्या सहकार्याने 'धक धक'ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कहाणी जगातील सर्वात उंच मोटरेबल पासवर आणि धाडसी बाइक ट्रिपच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटामध्ये चार स्त्री आपले सामर्थ्य दाखविताना दिसणार आहेत. या चित्रपटाची कहाणी खूप हटके असून या चित्रपटामध्ये प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण दुडेजा यांनी केले आहे.