मुंबई- भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावे केंद्र सरकार अत्यंत मानाचा पुरस्कार सिनेसृष्टीची सेवा केल्याबद्दल दिला जातो. तब्बल ५० वर्षे चित्रपटसृष्टीची सेवा करणाऱ्या सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा, असे मत दिग्गज रामदास फुटाणे, उज्वल ठेंगडी यांच्यासह अनेक मान्यवरांनी वारंवार व्यक्त केले होते. सुलोचना दीदींचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.
सुलोचना दीदींना निदान मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार द्यावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून केली आहे. सुलोचना यांच्या दीर्घ सेवेबद्दल पोस्ट लिहिल्यानंतर अखेरीस देसाई यांनी म्हटलंय की, 'त्यांच्या डोळ्यांतील चमक विलक्षण होती. हसणेही निर्मळ. एक माणूस म्हणून त्या खूप अस्सल आणि मोठ्या होत्या. दीदींना चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार, त्या हयात असताना देण्यात आला नाही. निदान मरणोत्तर तरी त्यांना हा सन्मान जरूर द्यावा आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरूर प्रयत्न करावा', असे माझे आवाहन आहे.
सुलोचना यांना फाळके पुरस्कार मिळावा अशी दिग्गजांनी केली होती मागणी - सुलोचना दीदींच्या ९०व्या वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या होत्या तेव्हा फाळके पुरस्कार सुलोचना दीदींना मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. तसेच अशा प्रकारची इच्छा लता दीदी (मंगेशकर), आशुतोष गोवारीकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आदींनी व्यक्त केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार सुलोचना दीदींना द्यावा अशी मागणी जोर धरली होती. मात्र पुढे काहीच घडले नाही.
ज्येष्ठ समीक्षक आणि चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांनीही अशी मागणी करताना म्हटले होते, ’सुलोचनादीदींची मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील दीर्घकालीन वाटचाल, अनुभव, अभिनय निष्ठा पाहता त्यांना यापूर्वीच दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात यायला हवे होते. नायिका ते चरित्र भूमिका असा यशस्वी चौफेर प्रवास करताना त्या एकूणच बदलत्या चित्रपटसृष्टीच्या साथीदार आणि साक्षीदारदेखील आहेत.’
ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक उज्वल ठेंगडी यांनीही सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली होती. याबद्दल बोलताना ठेंगडी म्हणाले होते, 'दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांनी काळ गाजवला आहे. एखादी भूमिका दाखवा ज्यामध्ये त्यांनी आपले अभिनय कलेचे प्राण ओतले नाहीत. अनेक चित्रपटातून अभिनेत्याच्या आईची भूमिका वटवत वेगळी ओळख चित्रपट सृष्टीत निर्माण केली आहे. तसेच देशातील राष्ट्रापतीच्या हस्ते सर्वाधिक गौरव झालेल्या त्या एकमेव अभिनेत्री आहेत. असे असताना दादासाहेब फाळके पुरस्कारापासून त्या वंचित असल्याचे पाहून वाईट वाटते'.
अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली होती. मात्र केंद्र सरकारकडून याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.