मुंबई- किंग खानचा मुंबईतील मन्नत बंगला हा चाहत्यांचे एकप्रकारे श्रद्धास्थान आहे. त्याच्या वाढदिवसाला, ईदला आणि इतर प्रसंगी किंग खानची एक झलक पाहण्यासाठी हजोरोंच्या संख्येने चाहते मन्नत बाहेर गर्दी करत असतात. इतरवेळी वाट वाकडी करुन ते घराच्या बाहेर असलेल्या मन्नत असे लिहिलेल्या बोर्डसोबत सेल्फी काढण्यातही धन्यता मानतात. पण शाहरुख खानने जेव्हा हा बंगला खरेदी केला तेव्हा त्याच्याकडे बंगल्याच्या रंगरंगोटी आणि रिनोव्हेशनसाठी पुरेसा पैसा नव्हता. हे लक्षात घेऊन त्याची पत्नी गौरी खानने घराच्या डिझायनरची भूमिका स्वीकारली. गौरी खानच्या 'माय लाइफ इन डिझाईन' या कॉफी-टेबल पुस्तकाच्या लाँचच्या वेळी मीडियाशी संवाद साधत शाहरुखने याचा उल्लेख केला.
गौरी खानचा डिझायनिंगच्या जगात प्रवेश- त्यांच्या घरातील मन्नत आणि गौरी खानने डिझायनिंगच्या जगात कसा प्रवेश केला याची रंजक गोष्ट सांगताना शाहरुख म्हणाला: 'जेव्हा आम्ही मन्नत विकत घेतले तेव्हा ते आमच्या क्षमतेच्या पलीकडे होते आणि एकदा आम्ही घर विकत घेतल्यानंतर ते सजवण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही एका डिझायनरची नियुक्ती केली, यातून आमच्या लक्षात आले की हा काही आपल्याला परवडणारा नाही.' 'म्हणून, मी गौरीकडे वळलो, कारण तिच्याकडे कलात्मक प्रतिभा होती आणि तिला आमच्या घराची डिझायनर बनवायला सांगितली. मन्नतची सुरुवात अशीच झाली आणि कालांतराने आम्ही कमावले आणि घरासाठी थोडेफार सामान खरेदी करत राहिलो. दक्षिण आफ्रिकेतून आम्ही सोफ्यासाठी चामडे विकत घेतले आणि मला वाटते की अशा प्रकारे धडे घेत तिने डिझाईन बनवले.'