मुंबई - sharad kelkar birthday special :शरद केळकरनं आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं आहे. त्यानं आपल्या अभिनय करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. 7 ऑक्टोबर 1976 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे जन्मलेल्या शरद केळकरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. शरद केळकर एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच एक उत्कृष्ट व्हॉईस ओव्हर कलाकार देखील आहे. आज बर्थडे स्पेशलमध्ये आम्ही तुम्हाला शरद केळकरच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगणार आहोत.
शरदचं बालपण :शरद हा मूळचा छत्तीसगडमधील जगदलपूरचा आहे, मात्र त्याचे संपूर्ण बालपण ग्वाल्हेरमध्ये गेलं. त्याचं महाविद्यालयीन शिक्षणही ग्वाल्हेरमधूनच झालं. तो अभ्यासात खूप हुशार होता. त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए केले. शरदला अभिनयाची खूप आवड होती. मुंबईत जाऊन बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याचं त्याचं स्वप्न होतं. शरद आपल्या चुलत भावाला भेटायला मुंबईत आला, तेव्हा त्याच्या चांगल्या लूकमुळे त्याला रॅम्पवर चालण्याची ऑफर मिळाली. यानंतर शरदनं ग्लॅमरच्या दुनियेत आपला प्रवास सुरू केला. त्यानं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही दूरदर्शनच्या 'आक्रोश' मालिकेतून केली. त्यानंतर त्यानं 'सीआयडी', 'उतरन' 'सिंदूर', 'सात फेरे' आणि 'रात होने को है' अशा अनेक मालिकेत काम केलं. याशिवाय त्यानं 'रॉक-एन-रोल', 'सारेगामापा चॅलेंज', 'पती-पत्नी और वो' यासारखे शो होस्ट केले.