मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मामधील अनेक तारे तारकांनी सोडून दुसऱ्या मालिका स्वीकारल्या आहेत. हे लोक शो का सोडतात हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. निर्माता असित मोदी यांनी मध्यंतरी शो सोडण्याचे कारण सांगताना वैयक्तिक कारणासाठी कलाकार शो सोडत असल्याचे सांगितले होते. मात्र तारक मेहताची भूमिका केलेल्या शैलेश लोढा यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक प्रतिक्रिया दिली आहे.
शैलेश लोढा यांनी निर्मात्याचे मत खोडून काढले आहे. 'काही व्यावसायिक लोक प्रतिभावान लोकांचा वापर करतात आणि स्वतः महान असल्याचा दिखावा करतात. जगात कोणीही निर्माता लेखकाहून मोठा असत नाही. जेव्हा प्रतिभावंत लेखक, कवीवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न होईल तेव्हा त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. ते लोक लेखकाच्या प्रतिभेच्या जीवावर पैसे कमवतात आणि वर लेखकाशीच उद्धट वागतात. वर हे लोक स्वतःची शेखी मिरवतात. संवेदनशील प्रतिभावंत हे सहन करु शकत नाहीत व मी त्यापैकीच एक आहे', असे शैलेश लोढा म्हणाले. तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही मालिकेतून बाहेर पडणाऱ्या कलाकारांची चर्चा नेहमी होत असते. मध्यंतरी या मालिकेतील अनेक दिग्गज कलाकार शो सोडून निघून गेल्यानंतर मालिकेच्या निर्मात्यांनी कालाकारांचे पैसे बुडवले म्हणून कलाकार नाराज झाले अशी चर्चा होती. मात्र बातम्या झळकल्यानंतर शोचे निर्माता असित मोदी यांनी पहिल्यांदाच याबद्दल आपले मत व्यक्त केले होते.