मुंबई- Y Plus security for SRK: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या जीवाला धोका असल्याचं मुंबई पोलिसांच्या निदर्शनास येताच, त्याला 'वाय प्लस' सिक्युरिटी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये त्याच्यासाठी 6 खासगी सुरक्षा अधिकारी आणि 5 शस्त्रधारी सुरक्षा रक्षक रात्रंदिवस शाहरुख खानसोबत राहणार आहेत. शाहरुखचा जीव धोक्यात असल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. त्यानंतर त्याला तातडीनं सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
लॉरेन बिश्नोईनंही दिली होती धमकी-यापूर्वी सलमान खानलाही अशाच प्रकारची सुरक्षा व्यवस्था मुंबई पोलिसांनी दिली आहे. लॉरेन बिश्नोईनं सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर, त्याला 'वाय प्लस सुरक्षा' देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला होता. शाहरुख खानलाही 'वाय प्लस सुरक्षा' देण्यात आल्यामुळे, आता राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या सहा प्रशिक्षीत कमांडोची एक टीम नेहमी त्याच्यासोबत राहील. त्यांच्याकडे एमपी गन, एके 47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्टल अशी आधुनिक शस्त्रे असतील.
एक ट्राफिक क्लियरन्स वाहनही असणार-शाहरुख खानच्या सुरक्षेशिवाय मुंबई पोलिसांचे चार जवान हत्यारांसह चोवीस तास त्याच्या घराचीही सुरक्षा व्यवस्था पाहणार आहेत. शाहरुख खान जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कारमधून प्रवास करेल, तेव्हा त्याच्या विंगमध्ये प्रशिक्षित कमांडोंचा समावेश असेल. त्याच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये एक ट्राफिक क्लियरन्स वाहनही असणार आहे. ट्राफिक क्लियरन्स वाहनामुळे शाहरुखच्या कार समोर कोणीही येऊ शकणार नाही. हे वाहन वाहतुक सुरळीत करण्यास मदत करणार आहेत. शाहरुख खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून Y+ एस्कॉर्ट सिक्युरिटी देण्यात आली असल्याची माहिती, कायदा व सुव्यवस्थेचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.