मुंबई - Satyashodhak Movie :मराठीमध्ये सध्या चर्चेत असलेला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'सत्यशोधक' हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. या चित्रपटाच्या करसवलतीचा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला होता. ‘सत्यशोधक’ चित्रपटाला करमुक्त करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. 'सत्यशोधक' या चित्रपटाद्वारे प्रेरणादायी लढा सर्वांसमोर येणार आहे. हा चित्रपट नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी याला करसवलत देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 जानेवारी रोजी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले होते.
सत्यशोधक चित्रपट करमुक्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्यशोधक सिनेमा टॅक्स फ्री झाल्याची घोषणा केल्यानंतर याबद्दल आनंद व्यक्त केला. या चित्रपटामध्ये संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय राजश्री देशपांडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत. प्रा.हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मित झालेला हा चित्रपट हा प्रेक्षकांना कमी दराच्या तिकिटमध्ये पाहायला मिळणार आहे. शासन आदेश जारी झाल्यापासून प्रेक्षकांकडून एसजीएसटी वसुल न करता हा चित्रपट दाखविण्यात येत असल्यानं आता अनेकजण आनंदी आहेत. या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे.