मुंबई : सारा अली खान आज १२ ऑगस्ट रोजी आपला २८वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा तिच्या साधेपणासाठी आणि मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सारा अली खानने 'केदारनाथ' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली, ज्यापैकी काही हिट तर काही फ्लॉप ठरले. सारा शेवटी 'जरा हटके जरा बचके'मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
सारा धार्मिक स्थळांवर करते प्रार्थना : साराने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला आध्यात्मिक स्थळांना भेट द्यायला आवडते. सारा अनेकदा धार्मिक स्थळांवर प्रार्थना करताना दिसते. गुवाहाटीतील कामाख्या मंदिर आणि उज्जैनमधील महाकाल मंदिराला तिने भेटी दिल्या होत्या, अनेकदा ती मनाच्या शांतीसाठी वेगवेगळ्या धार्मिक स्थळी जाताना दिसते.
'केदारनाथ' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट : साराने २०१८ मध्ये 'केदारनाथ'मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. चित्रपटरसिकांना पडद्यावरचा तिचा वावर सुखद आणि प्रसन्न वाटला. या चित्रपटात तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत दिसला होता. या चित्रपटात दोघांच्याही अभिनयाचे कौतुक झाले. त्याचबरोबर चाहत्यांना सारा आणि सुशांत जोडीही खूप आवडली होती. याशिवाय साराला त्या वर्षीचा 'केदारनाथ' चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री'चा पुरस्कार देखील मिळाला होता.
'सिम्बा'चा धमाका : 'केदारनाथ'नंतर सारा त्याच वर्षी रोहित शेट्टीचा 'सिम्बा' मिळाला. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत झळकली होती. रणवीरसोबतही साराची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. 'सिम्बा' हा त्या वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट तेलुगू चित्रपट 'टेम्पर'चा हा रिमेक होता.