मुंबई - Tiger 3 OTT Release: अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' गेल्या महिन्यात 12 नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यश राज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आणि टायगर फ्रँचायझीचा तिसरा पार्ट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. सलमान खानच्या 'टायगर 3'नं जगभरात 450 कोटींहून अधिक कमाई केली आहे. देशांतर्गत हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा पार करण्याच्या अगदी जवळ आला आहे. दरम्यान, अनेक चाहते चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. 'टायगर 3' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, ते आपण जाणून घेऊया.
ओटीटीवर 'टायगर 3' :मनिष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा पार्ट असून याआधी 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' हे पार्ट रिलीज झाले होते. या चित्रपटांची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. रुपेरी पडद्यावर या चित्रपटांनीदेखील जबरदस्त कमाई केली होती. यश राज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचे डिजिटल अधिकार अॅमेझॉन प्राईमकडे आहेत. अॅमेझॉननं या चित्रपटांचे अधिकार हे मोठ्या रकमेत विकत घेतले आहे. त्यामुळं हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. 'टायगर 3'च्या ओटीटी रिलीज तारखेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.