मुंबई- सुपरस्टार सलमान खान मंगळवारी मुंबईतील विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्थेत दिसला. कॅज्युअल पोशाखात - काळ्या पँटसह तपकिरी शर्ट घालून सलमान येथील कलिना विमानतळावरून बाहेर पडताना दिसला. यावेळी सलमानने ब्लॅक कॅपने त्याचा लूक ऍक्सेसराइज केला होता. तो त्याच्या कारकडे जाण्यापूर्वी विमानतळाबाहेर उभे असलेल्या पापाराझींनी त्याला फोटोसाठी हाक दिली. 'भाई भाई', असे ओरडणाऱ्या फोटोग्राफर्सना हात दाखवत तो त्याच्या कारमध्ये बसला. त्याच्या मागे सुरक्षा रक्षकांसह बॉडीगार्ड शेरा दिसत होता. त्याची कार पुढे जाताच पापाराझींनी त्याच्या कारला गराडा घातला होता. मागोमाग पोलीस जवान आणि इतर सुरक्षा रक्षकांच्या गाड्या यांचा ताफा जाताना दिसला.
नुकतेच पनवेल येथील सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे तरुण झाडाच्या मदतीने कंपाउंडची भिंत ओलांडून घरात शिरायचा प्रयत्न करत होते. सलमानच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले व त्यांनी दोघांची चौकशी सुरू केली. त्यांच्याकडे असलेली ओळखपत्रेही बनावट निघाल्याचे मसजते. यापार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षा व्यवस्थेकडे गंभीरपणे पाहिलं जातं आहे. यापूर्वी सलमानला जीवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळाल्या आहेत. सरकारनेही त्याच्या सुरक्षेसाठी काही जवान तैनात केले आहेत.