हैदराबाद - Salaar vs Dunki release clash : यंदाच्या ख्रिसमसमध्ये शाहरुख खान विरुद्ध प्रभास असा सामना रंगणार आहे. दोघांचेही बहुप्रतीक्षित चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. प्रभासचा सालार आणि शाहरुखच्या डंकी या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार याची निश्चिती झाली आहे. हे दोन्ही चित्रपट यावर्षी 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहेत.
'सालार भाग 1 - सिझफायर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. होंबाळे फिल्म्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बोलताना निर्मात्यांनी सांगितलं की, दोन्ही चित्रपट मोठे आहेत. भारतासारख्या देशामध्ये एकाचवेळी दोन चित्रपट रिलीज झाले तरी तितकी जागा आहे. त्यामुळे लोकांना दोन्ही चित्रपट पाहण्याचा ऑप्शन असू शकतो. शिवाय सालार हा चित्रपट पाच भाषामध्ये रिलीज होणार असल्यामुळे सर्व वितरकांच्या सोयीचाही विचार करावा लागतो. त्यामुळेच हा सिनेमा 22 डिसेंबरला रिलीज करण्याचा निर्णय होंबाळे फिल्मसने घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
केजीएफ फेम प्रशांत नीलच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'सालार' हा प्रभासचा 'आदिपुरुष' चित्रपटानंतरचा मोठा चित्रपट आहे. 'आदिपुरुष'ला अपयश आल्यानंतर प्रभासच्या प्रतिमेला धक्का बसला होता. यातून उभारणी घेण्यासाठी 'सालार' हा त्याचा महत्त्वकांक्षी चित्रपट मानला जातो. त्यामुळे या चित्रपटाकडे तमाम प्रेक्षकांसह चाहत्यांच्या नजरा रिलीजकडे लागल्या आहेत.
सालार विरुद्ध डंकी या दोन चित्रपटाच्या संघर्षाने चित्रपट व्यवसायाची चिंता वाढवली आहे कारण अनेक तज्ञांनी अशा पद्धतींना चित्रपट उद्योगासाठी हानिकारक मानले आहे. कोविड महामारीमुळे गंभीरपणे प्रभावित झाल्यानंतर चित्रपट व्यवसाय हळूहळू सावरत आहेत. दरम्यान, या वर्षी शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश कमावलं आहे. त्याचा 'डंकी' हा चित्रपट यंदा हॅट्रीक करण्याची शक्यता वर्तवली जातेय. प्रभाससाठी हा काळ खूप जिकीरीचा आणि महत्त्वाचा आहे. असे असले तरी सालार चित्रपटाच्या निर्मात्यांना त्यांच्या निर्मिती मुल्यांवर आणि दर्जावर पूर्ण भरोसा आहे. हा चित्रपट सर्व संकटांचा सामना करु शकतो आणि यशस्वी ठरु शकतो या विश्वासानंच त्यांनी या रिलीज तारखेचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.