मुंबई- Salar Advance Booking Record : इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार 'सालार'च्या पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनने शाहरुख खान स्टारर 'जवान' आणि पठाण, रणबीर कपूर स्टारर अलीकडील हिट चित्रपट 'अॅनिमल' आणि विजय स्टारर 'लिओ' या चित्रपटांना मागे टाकलंय.
प्रभास स्टारर 'सालार' चित्रपटाला 'डंकी'च्या शर्यतीत योग्य प्रमाणात स्क्रीन वाटप नुळाले नसल्याच्या चर्चा असूनही, 'सालार' निःसंशयपणे या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर एक उत्तम ओपनिंगसाठी सज्ज आहे. सॅकनिल्क वरील अहवालात म्हटले आहे की, चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 48.94 कोटी रुपयांची कमाई केली. अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे सूचित करतात की 'सालार' चित्रपटाने 2023 च्या प्रमुख हिट चित्रपटांना मागे टाकले आहे.
उदाहरणार्थ, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' चित्रपटाने अॅडव्हान्स विक्रीच्या पहिल्या दिवशी ३२.०१ कोटी रुपयांची कमाई करून विक्रम केला होता. 'जवान'ने ही रक्कम ओलांडली आणि अॅडव्हान्स तिकिटांमध्ये तब्बल 40.75 कोटी रुपयांची कमाई केली. रणबीर कपूरच्या सर्वात अलीकडील चित्रपट, 'अॅनिमल'ने बॉक्स ऑफिसवर 33.97 कोटी रुपयांच्या अॅडव्हान्स विक्रीसह ऐतिहासिक सुरुवात केली, तर विजयच्या बहुप्रतिक्षित 'लिओ' चित्रपटाने मोठ्या यशासाठी प्रीमियर केला आणि दिवसभरासाठी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल 46.36 कोटी रुपयांची कमाई केली होती.