मुंबई Rashmika Mandanna : साऊथ फिल्म इंडस्ट्रीत एकामागून एक हिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये पोहोचलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या चर्चेत आली आहे. तिचा नुकताच सोशल मीडियावर एक मॉर्फ व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळं ती सध्या खूप अस्वस्थ झाली आहे. रश्मिकानं याप्रकरणी तिची प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी देखील सुशांत सिंग राजपूतचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेकांना हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटलं होतं. दरम्यान रश्मिकाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं की, या व्हिडिओत रश्मिका आहे. मात्र त्यानंतर खरा व्हिडिओ समोर आला.
रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ व्हायरल :रश्मिका मंदान्नानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सांगितलं की, 'हा व्हिडीओ केवळ माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळं आज लोकांचं खूप नुकसान होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ ब्रिटिश-भारतीय महिलेचा आहे, जी लिफ्टच्या आत काळे कपडे घातलेली आहे. या महिलेचा चेहरा रश्मिकासारखा दिसण्यासाठी एआयच्या डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं बनावटी व्हिडिओ तयार केला. रश्मिकाचा व्हिडिओ इतका खरा वाटत आहे की, अनेकांना आधी हा व्हिडिओ खरा वाटला होता. त्यानंतर काही यूजर्सनं तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना ही काळ्या रंगाच्या डीपनेक जंपसूटमध्ये लिफ्टच्या दरवाजातून बाहेर येत असल्याचं दिसत होती. त्यानंतर खरा व्हिडिओ एक्स हँडलवर समोर आला. खरा व्हिडिओ समोर आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तो व्हिडिओ शेअर करून कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.