मुंबई -Ranbir Kapoor break from films : अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी तो त्याच्या चाहत्यांशी चांगला सुसंवाद राखत असतो. अलीकडेच त्यान झूम कॉलवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यानं त्याच्या आगामी कामाबाबतही सांगितलं. सध्या त्याच्या नितेश तिवारी बनवत असलेला 'रामायण' आणि अनुराग बसू दिग्दर्शित किशोर कुमार बायोपिकची सर्वाधिक चर्चा आहे. याबाबतचे काही खुलासे रणबीर कपूरनं या चर्चेच्या दरम्यान केले. या महत्त्वपूर्ण प्रोजेक्टबद्दल अधिकृतपणे काहीही घोषणा झाली नसली तरीही, रणबीर कपूरच्या कथित सहभागाच्या चर्चांमुळे चित्रपटांबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
अनुराग बसू दिग्दर्शित किशोर कुमार बायोपिकवर अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. रणबीर कपूरनं सांगितलं की, तो या महिन्याच्या अखेरीस स्क्रिप्टचं पुन्हा एकदा वाचन करेल. ही भूमिका अद्यापही त्याला मिळालेली नाही. रामायणाच्या संदर्भात त्यानं स्पष्ट केलं की त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणि व्यापक कामाची आवश्यकता असल्यामुळे काहीही अंतिम ठरलेलं नाही. अनेक कल्पना ऐकल्या असल्या तरी पुढील वाटचालीसाठीची दिशा लवकरच ठरेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
सततच्या कामात गुंतून राहिल्यामुळे मुलगी राहासोबत क्वालिटी टाइम घालवता येत नाही, अशी खंतही त्यानं चाहत्यांशी बोलताना व्यक्त केली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रणबीर आणि आलियानं राहा या चिमुकलीला जन्म दिला होता. मुलीसाठी वेळ देण्यासाठी कामाच्या घाईतून सहा महिन्यांची सुट्टी घेण्याचा विचार असल्याचाही त्यानं सांगितलंय. हा निर्णय त्याची पत्नी आलिया भट्टच्या आगामी प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या जिग्राच्या शूटिंगच्या बिझी शेड्यूलच्या अनुषंगाने आहे. वासन बाला दिग्दर्शित या चित्रपटात आलिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.