मुंबई - Rakhi sawant :अभिनेत्री राखी सावंत आता ही तिच्या वादग्रस्त विधानामुळं नेहमीच चर्चेत असते. दरम्यान पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. राखी सावंतवर एका मॉडेलनं अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी राखी सावंतनं सध्या केली आहे. यासाठी तिनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राखीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. पुढील काही दिवसांत उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होईल. राखीवर हा गुन्हा 31 ऑक्टोबर 2022 रोजी दाखल करण्यात आला होता.
राखी सावंतवर केला गुन्हा दाखल : हा गुन्हा रद्द करण्यासाठी राखी सावंतचे वकील अली काशीद खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राखी सावंत यांनी कोणतीही बदनामी केलेली नाही, असं याचिकेत नमूद केलंय. याशिवाय या महिलेनं राखी सावंतसोबत सूड घेण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे असं या याचिकेत आहे. राखी सावंतनं तक्रारदार महिलेचे काही व्हिडिओ सार्वजनिक केले होते, त्यामुळं या महिलेनं तिला बदनाम करत असल्याचं म्हटलं होतं.