मुंबई- बॉलिवूडचा कॉमेडीयन अभिनेता राजपाल यादवच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. त्याच्या काम चालू है या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. या चित्रपटाचे काम सुरू झाल्याचे ट्विट ट्रेड पंडित तरण आदर्श यांनी केले आहे. या चित्रपटातील राजपालचा फर्स्ट लूक प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये तो मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जिया मानेक आणि टीव्हीवरील बालकलाकार कुरंगी नागराज यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे संपूर्ण शुटिंग सांगलीत होणार असल्याचेही तरण आदर्श यांनी म्हटलंय.
'काम चालू है' चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पलाश मुच्छल करत आहे. बेसलाईन स्टुडिओज आणि पाल म्यूझिकच्या वतीने या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. दिग्दर्शक पलाश मुच्छल हा गायिका पलक मुच्छलचा संगीतकार भाऊ आहे. राजपाल यादवनेही आपल्या सोशल मीडियावर काम चालू है च्या शुटिंगला सुरुवात झाल्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोत राजपालसह दिग्दर्शक पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधाना दिसत आहे. फोटोत राजपालने गुलाबी टी शर्टवर निळ्या रंगाचे जॅकेट घातले असून गळ्याभोवती मफलर गुंडाळला आहे.
पलाश मुच्छल आणि स्मृती मंधानाच्या टेडिंगची चर्चा- पलाश मुच्छल हा उत्तम गायक आणि संगीतकार आहे. त्याची आणि महिला क्रिकेटर स्मृती मंधाना हिची खास मैत्री आहे. सातत्याने ते एकमेकांना भेटतात. पलाशची बहिण पलक मुच्छलने गेल्या वर्षी संगीतकार मिथून शर्मासोबत लग्न केले. याच्या रिसेप्शनला स्मृती मंधना खास उपस्थित राहिली होती. दोघांच्याही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे असंख्य फोटो आहेत.
एकमेकांच्या वाढदिवसाला ते शुभेच्छा तर देतातच पण दोन महिन्यापूर्वी जेव्हा पलाशचा वाढदिवस झाला तेव्हा त्याने आपल्या हातावर 'SM १८' अशी इंग्रजी अक्षरे आपल्या हातावर गोंदली होती. '१८' क्रमांक हा स्मती मंदानाच्या क्रिकेट जर्सीचा नंबर आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे दोघे डेटिंग करत असल्याच्या चर्चा बऱ्याचदा रंगल्या आहेत. मात्र दोघांनीही उघडपणे याला कबुली दिलेली नाही. पण आता पलाश मुच्छल चित्रपटाच्या दिग्दर्शनात उतरला आहे आणि याची सुरुवात तो स्मृती मंधानाच्या सांगली शहरातून करतोय आणि याच्या शुटिंगला स्वतः स्मृती वेळ काढून उपस्थित राहते याचा अर्थ सूज्ञ समजू शकतात.