मुंबई- राजपाल यादव प्रमुख भूमीकेत असलेला 'काम चालू है' चित्रपटाच्या शूटिंगचा समारोप सांगलीत झाला. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या चित्रपटाचे शूटिंग सांगलीत सुरू होते. शहरातील वेगवेगळ्या लोकोशन्सवर याचे वास्तववादी चित्रण करण्यात आले. या शूटिंगच्या काळात राजपाल यादव सांगलीकरांच्या प्रेमात पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील अनेक चाहत्यांशी त्याने संपर्क साधला. शूटिंग पूर्ण होण्यापूर्वी सांगलीच्या ढोल पथकासोबत एक सीन्स शूट करण्यात आला. यामध्ये ढोलवादनाच्या तालावर बेभान होऊन अतरंगी स्टेप्सवर थिरकतानाचा एक व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे.
फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'काम चालू है' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचे ट्विट केले आहे. त्याने लिहिलंय की, 'राजपाल यादवच्या 'काम चालू है' चित्रपटाचे सांगलीमध्ये शूटिंग पूर्ण पार पडले. राजपाल यामध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहे. या शिवाय या चित्रपटात अभिनेत्री जिया मानेक आणि टीव्हीवरील बालकलाकार कुरंगी नागराज यांच्या भूमिका आहेत. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पलाश मुछल याने केले आहे. चित्रपटाची निर्मिती बेसलाईन स्टुडिओज आणि पाल म्यूझिक अँड फिल्म्सने केली आहे.'
सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर शहराच्या फलकासह राजपाल यादव आणि पलाश मुछल उभे असलेला एक फोटो शेअर करण्यात आला आहे. दोघांसोबत चित्रपटाचा कॅमेराही दिसत आहे. यात राजपाल गडद गुलाबी रंगाचे शर्ट आणि जीन्स पँटसह दिसत असून त्याच्या पायात साधे सँडल आहे. गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक असलेल्या पलाश मुछलने लायनिंग शर्ट व पँटसह शूज घातले आहेत. 'सांगली ने दिल जीता', असे पलाश मुछलने त्याच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे.
'माझ्या कथा कथनासाठी मी वास्तव लोकेशन्सचा वापर करतो', असे म्हणत पलाशने एक शुटिंग दरम्यानचा फोटो काही दिवसापूर्वी त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये सांगलीतील रेल्वे रुळावर त्यानी कॅमेरा सेट केल्याचे दिसत आहे व त्याची टीम शॉटसाठी सज्ज दिसत असताना पलाश त्यांना सूचना देताना दिसतो. 'काम चालू है' चित्रपटाच्या मूहुर्ताच्या प्रसंगी भारतीय क्रिकेटर स्मृती मंधाना हजर होती. दिग्दर्शक पलाश मुछल हा स्मृती मंधानाचा खास मित्र आहे. त्यांच्यात डेटिंग सुरू असल्याच्याही अनेकदा चर्चा रंगल्या आहेत.