लॉस एंजेलिस - Preity Zinta with twins : अभिनेत्री प्रिटी झिंटा सध्या रुपेरी पडद्यापसून दूर असली तरी ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या खासगी आयुष्यातील अपडेटस् शेअर करते. चाहतेही तिच्या पोस्टवर व्यक्त होतात आणि आपल्या मनापासूनच्या प्रतिक्रिया देत असतात. अलीकडेच प्रिटीने पोस्ट केलेले फोटो चाहत्यांचं लक्ष वेधणारे आहे. ती आपली मुले जय आणि जियासह बीचवर आनंद घेत असताना या फोटोत खूप सुंदर दिसत आहे. या फोटोत तिची मुलं वाळूत खेळताना दिसताहेत.
आणखी एका फोटोत प्रिटी झिंटा जियाला आपल्या जवळ धरून तिचं छान स्मितहास्य कॅमेऱ्याला दाखवतेय. 'बीच डेज' असं कॅप्शन तिनं या पोस्टला दिलंय. हे फोटो पोस्ट केल्यानंतर नेहमीप्रमाणे चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाच्या संदेशांसह शुभेच्छांची उधळण केली. चाहते तिच्या मुलांचं कौतुक करताना स्तुतीसुमनांची अक्षरशः उधळण करताहेत.
जीन गुडइनफबरोबर लग्न झाल्यापासून प्रिटी लॉस एंजेलिसमध्ये राहते. या जोडप्याने 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजेलिसमध्ये लग्न केलं होतं. 2021 मध्ये त्यांच्या संसारवेलीवर जुळ्या फुलांचा बहर आला. त्यांना जय हा मुलगा आणि जिया ही मुलगी आहे. ही जुळी भावंडं खूप गोड दिसतात.
एएनआयशी अलीकडेच बातचीत करताना प्रिटीनं पालक म्हणून तिच्या जीवनप्रवासाकडं डोकावून पाहिलं. मुलांना झोप यावी यासाठी ती 'कोई... मिल गया' हे शीर्षक गीत ऐकवत असल्याचं तिनं यावेळी उघड केलं. हे गीत ऐकल्याशिवाय मुलांना झोप येत नसल्याचं तिनं सांगितलं. या गाण्याचं संगीत ऐकत मुलं निद्रेच्या अधीन होतात. ही मुलं म्हणजे तिच्यासाठी जादू असल्याचंही सांगायला ती विसरली नाही. 'कोई मिल गया' चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण होताना आपल्या मुलांच्या झोपी जाण्याच्या सवयीबद्दलचा किस्सा सांगितला होता. प्रिटीने हृतिक रोशनच्या प्रेयसीची भूमिका साकारलेल्या या चित्रपटाला 8 ऑगस्ट रोजी 20 वर्षे पूर्ण झाली.
'कोई मिल गया' च्या सेटवरील आठवणींना उजाळा देताना प्रिटी झिंटानं हृतिकवर भडकल्याचा एक मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, 'मला शूटिंगचा पहिला दिवस आठवतो, हृतिकला उशीर झाल्यामुळे मी चिडले होते आणि अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी टपली मारली, मी वळले आणि तो रोहितच्या लूकमधील हृतिक होता. तो अजिबात ओळखू येत नव्हता. मी त्याला पाहून आश्चर्यचकित झाले. मग मला धक्का बसला की हृतिक तर सेटवरच होता पण मी त्याला ओळखले नव्हते.'