हैदराबाद- Prabhas wax statue removed एसएस राजामौली यांच्या बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटातील भूमिकेनं संपूर्ण भारत वासियांना वेड लावलं. प्रभासच्या या चित्रपटातील व्यक्तीरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली होती. बाहुबलीतील प्रभासच्या या प्रतिष्ठित भूमिकेतील सुपरस्टार प्रभासच्या मेणाच्या पुतळ्याचं बुधवारी कर्नाटकातील म्हैसूर येथील चामुंडेश्वरी सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये लॉन्चिंग करण्यात आलं. परंतु, बाहुबलीच्या निर्मात्यांच्या पसंतीस हा पुतळा काही पडला नाही. बाहुबलीचे निर्माता शोबू यारलागड्डा या पुतळ्याच्या प्रतिमेवर खूश नाहीत आणि त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय.
निर्माता शोबू यारलागड्डा यांनी ट्विट केलं आहे की बाहुबलीच्या वेशातील प्रभासचा हा पुतळा स्थापित करण्यापूर्वी संग्रहालयाने त्यांची मंजुरी मागितली नव्हती. या प्रकरणी निर्मात्याने कडक ताशेरेही ओढले आहेत. X वर मत व्यक्त करताना ( पूर्वीचे ट्विटर) निर्मात्याने संग्रहालयाच्या टीमला खडे बोल सुनावले आणि लिहिलं, 'हे अधिकृतपणे आणि आमच्या परवानगीशिवाय किंवा माहितीशिवाय केलेलं काम आहे. आम्ही हा पुतळा काढून टाकण्यासाठी त्वरित पावले उचलणार आहोत.'
निर्मात्याच्या प्रतिक्रियेला उत्तर देत संग्रहालयाच्या टीमने प्रभासचा मेणाचा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतलाय. एका वेबलॉईडने दिलेल्या माहितीनुसार संग्रहालयाच्या मालकानं खुलासा केलाय की, 'बाहुबली चित्रपटाच्या निर्मात्याने पुतळ्याबद्दल संताप व्यक्त केला. आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नसल्यामुळे आम्ही पुतळा हटवणार आहोत.'
चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या गाजलेल्या 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लूजन', या दोन्ही भागांनी जगभरातील प्रेक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळवली होती. जगभरात 1000 कोटी रुपयांचा गल्ला पार करणारा हा देशातील पहिला चित्रपट ठरला होता. प्रभास व्यतिरिक्त, बाहुबलीचित्रपटाच्या दोन्ही भागामध्ये राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, रम्या कृष्णन, सत्यराज आणि नस्सर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.