भुवनेश्वर - ओडिया अभिनेता पिंटू नंदा यांच्या क्रॉनिक लिव्हर फेल्युअरवर उपचार सुरू असताना बुधवारी रात्री 11:25 वाजता हैदराबादमधील यशोदा रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांनी एक्झीट घेतल्यामुळे सिनेवर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोकप्रिय ऑलिवूड अभिनेता पिंटू नंदा यांना एक्यूट ऑन क्रॉनिक लिव्हर फेल्युअरचे निदान झाले होते आणि त्यांना लवकरात लवकर यकृत प्रत्यारोपण करण्यास सांगण्यात आले होते. अभिनेत्यावर कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (KIMS), भुवनेश्वर येथे उपचार सुरू होते परंतु कालांतराने त्यांची प्रकृती खालावली. 7 फेब्रुवारीला पिंटू यांना गंभीर अवस्थेत दिल्लीला नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना पुढील 6 महिन्यांत यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला.
त्यांना काही दिवस नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र गेल्या आठवड्यात त्यांना अधिक काळजीसाठी हैदराबादला हलवावे लागले. त्यानंतर दिल्लीत देणगीदारांच्या अनुपलब्धतेमुळे पिंटूला हैदराबादच्या याशोदा रुग्णालयात हलवण्यात आले. पिंटू यांना कुटुंबातील एका सदस्याकडून यकृत दान करायचे होते, परंतु रक्तगट जुळत नसल्यामुळे आणि इतर काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. बुधवारी रात्री 11:25 च्या सुमारास, रक्तदाता सापडण्यापूर्वीच नंदा यांचे निधन झाले.
पिंटू नंदा हे हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखले जात असत. त्यांच्या दुर्धर आजाराची बातमी जेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी कळली तेव्हा त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला होता. ओडिसा चित्रपट उद्योगाला ऑलिवूड म्हणून ओळखले जाते. तर या ऑलिवूड सिने आर्टिस्ट असोसिएशनने पिंटू यांच्या उपचारासाठी निधी संकलानाचे काम केले. सर्जरी आणि ट्रान्सप्लान्टचा खर्च मोठा असल्याने सहकलाकारांनी पिंटू यांच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम केले. सर्वांनाच या गंभीर आजारातून ते बाहेर पडतील अशी आशा वाटत असतानाच त्यांच्या निधनाची दुःखद बातमी येऊन पोहोचली आहे.
ओडिशातील अनेक नामवंत मान्यवरांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर शोक सोशल मीडियावरुन व्यक्त केला आहे. मानस मंगराज, खासदार (राज्यसभा), यांनी ट्विटरवर शोकसंतप्त कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. पिंटू नंदा 'जय जगन्नाथ', 'आय लव्ह माय इंडिया' आणि 'दोस्ती' या अल्बममधील भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी 'रॉँग नंबर' आणि 'लव्ह एक्सप्रेस' सारख्या अनेक ओडिया सिनेमांमध्ये काम केले. त्यांचा ओडिया अल्बम 'ई गौरा' याने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. 'ई गौरा' मधील भूमिकेसाठी आणि जय जगन्नाथ चित्रपटातील भगवान बाळा भद्राच्या भूमिकेसाठी ते लक्षात राहतील.
हेही वाचा -Bhool Bhulaiyaa 3 : भूल भुलैया 3 सह रुपेरी पडद्यावर पुन्हा परतणार कार्तिक आर्यन