मुंबई- अभिनेता परेश रावल आज आपला ६८ वा वाढदिवस साजरा करत आहे. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित परेश यांना खलनायक ते उत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गेली ३८ वर्षे फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या परेश रावल यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिका समरस होऊन साकारल्या. त्यांनी अनेक व्यक्तीरेखामध्ये अक्षरशः प्राण फुंकले आहेत.
परेश रावल यांची लोकप्रियतेकडे वाटचाल- अर्जुन या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर १९८६ मध्ये त्यांना नाम या गाजलेल्या चित्रपटात चांगली भूमिका मिळाली आणि त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करुन दाखवले. एक चतुरस्त्र कलाकार म्हणून त्यांनी ८० ते ९० च्या दशकात सुमारे शंभर चित्रपटातून अनेक व्यक्तीरेखा साकारल्या. एक क्रूर खलनायक साकारताना त्यांनी एक प्रकारे रुपेरी पडद्यावर दहशत निर्माण केली होती. रुप की राणी चोरों का राजा, किंग अंकल, राम लखन, दौड, बाजी यासारख्या चित्रपटातून त्यांनी व्हिलनची भूमिका केल्या.
हेरा फेरीमधील बाबूभैय्या- २००० मध्ये आलेल्या हेरा फेरी चित्रपटाने परेश रावल यांनी कमाल केली. बाबूराव आपटे हा भोळसर आणि निरागस घर मालक त्यांनी ताकदीने साकारला. त्यांच्या घरात भाडेकरु म्हणून राहणारे राजू (अक्षय कुमार) आणि श्याम (सुनील शेट्टी) हे दोन भाडेकरु यांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री आजही मीम्सचा विषय आहे. दृष्टी धुसर झालेला, बढाया मारणारा आणि मराठमोळा बाबूराव आपटे त्यांनी अक्षरशः जीवंत केला. यातील भूमिकेसाठी परेश रावल यांना अभिनयासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार मिळाला. त्यानंतर २००६ मध्ये आलेल्या हेरा फेरीच्या सीक्वेलमध्येही भूमिकेची ग्रीप न सोडता त्यांनी कमाल केली होती. परेश रावल हे हिंदी सिनेसृष्टीत जितके लोकप्रिय आहेत तितकेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्यांचा मोठा दबदबा आहे.
ओ माय गॉडमुळे प्रचंड लोकप्रियता- 'ओ माय गॉड' (OMG) चित्रपटाने हेरा फेरीनंतर पुन्हा धुमाकुळ घातला. या चित्रपटातील त्यांनी साकारलेली कांजीलाल मेहता ही व्यक्तीरेखा प्रचंड गाजली. एक नास्तिक व्यापारी भूकंपानंतर त्याच्या दुकानाचे झालेले नुकसान विमा कंपनीकडे मागतो. विमा कंपनी मात्र भूकंप ही दैवी घटना असल्याचे मानत नुकसान भरपाई नाकारते. मग तो आपला मोर्चा मंदिरांचे पुजारी आणि भोंदू साधू यांच्याके वळवतो आणि एका वेगळ्या वळणावर चित्रपटाचे कथानक पुढे सरकते. यात त्याची पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत ऑन स्क्रिन केमेस्ट्री जुळून आली होती.
ओ माय गॉडमधील कांजीलाल मेहता राजकारणात प्रवेश आणि खासदारकी - २०१४ मध्ये परेश रावल यांना गुजरातमधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभेचे तिकीट मिळाली. एक अभिनेता म्हणून असलेली त्यांची लोकप्रियता आणि त्याकाळात नरेंद्र मोदी यांचे झंझावात यामुळे ते लोकसभेत निवडून गेले. पाच वर्षाच्या त्यांच्या खादारकीच्या काळात त्यांचे थोडे अभि्नयाकडे दुर्लक्ष झाले पणयाकाशात त्यांनी अनेक राजकीय भूमिका घेऊन पक्षाचे समर्थन केले. २०२० मध्ये परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. परेश रावल यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कारही देण्यात आलाय.
परेश रावल यांना पद्मश्री पुरस्कार परेश रावल यांची वर्कफ्रंट - हेरा फेरी चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच येणार आहे. पुन्हा एकदा बाबूराव गणपत आपटे यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रतीक्षा करत आहेत. यात पुन्हा एकदा सुनिल शेट्टी, कार्तिक आर्यन यांच्यासोबत त्यांची केमेस्ट्री असेल. यात अक्षय कुमारही भूमिका करणार असल्याची सध्या चर्चा आहे. दरम्यान परेश रावल पुन्हा एकदा गुजराती फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय झाले असून त्यांचा डियर फादर हा चित्रपट सध्या प्राईम व्हिडिओवर स्ट्रिम झाला आहे.
हेही वाचा -Nick Jonas Lauds Tiger Shroff : टायगर श्रॉफने गायले निक जोनासचे गाणे, व्हिडिओ पाहून निक म्हणाला, 'लव्ह इट ब्रो'