मुंबई -आज सकाळी प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत निधन झाले असून संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ते ८४ वर्षांचे होते आणि त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९३८ चा आणि त्यांनी आज १० मे २०२२ रोजी हे जग सोडले. शिवकुमार शर्मा हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत, ज्यात १९८५ मध्ये यूएसए, बाल्टिमोर शहराचे मानद नागरिकत्व तसेच १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार व पद्मश्री आणि पद्मविभूषण यांचा समावेश आहे.
काही दशकांपूर्वी जरी तबला, सतार, वीणा, हार्मोनियम सारखी वाद्य सामान्यजनांना माहित असली तरी संतूर नावाचे वाद्य असते हे माहित नव्हते. जम्मू प्रांतातील एक युवक, शिवकुमार शर्मा, संतूर वादनाचे कार्यक्रम करू लागला आणि त्या वाद्याला देशमान्यता मिळाली. संतूर हे मूलतः एक लोक वाद्य आहे. संतूर वरील शास्त्रीय संगीत त्याने प्रसिद्ध केले आणि त्याला आणि संतूरला लोकाश्रय मिळाला. शिवकुमार शर्मा यांनी रागदारी पेश करीत पांडित्य मिळविले आणि ते पंडित शिवकुमार शर्मा म्हणून ओळखले जाऊ लागले.
शिवकुमार शर्मा यांनी फक्त पाच वर्षांचे असताना गायन आणि तबला शिकायला सुरुवात केली आणि वयाच्या तेराव्या वर्षी संतूर शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी १९५५ मध्ये मुंबईत पहिला सार्वजनिक परफॉर्मन्स दिला तसेच त्यांनी १९६० मध्ये आपला संतूर वादनाचा पहिला एकल अल्बम रेकॉर्ड केला. शिवकुमार शर्मा यांना दोन मुले आहेत जे आपल्या वडिलांच्या संतूर वादकीचा वारसा पुढे नेत आहेत.
संतूरला लोकप्रिय शास्त्रीय वाद्य बनवण्याचे श्रेय शिवकुमार शर्मा यांना जाते. १९५६ मध्ये व्ही शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील एका दृश्यासाठी त्यांनी पार्श्वसंगीत तयार केले होते. १९६७ मध्ये, त्यांनी बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि गिटार वादक ब्रिजभूषण काबरा यांच्यासमवेत एक संकल्पना अल्बम, कॉल ऑफ द व्हॅली तयार केला, जो भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात लोकप्रिय अल्बम्सपैकी एक ठरला. पुढे, त्यांनी हरिप्रसाद चौरसिया यांच्या सहकार्याने अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले आणि ती जोडी शिव-हरी संगीत जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली.