मुंबई - गेल्या काही वर्षापासून शिवकालिन ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीसाठी जीवाची बाजी लावून योगदान देणाऱ्या पराक्रमाच्या कथा प्रेक्षक आवर्जुन पाहातात. अशा चित्रपटांच्या निर्मितीत जर काही त्रुटी राहिल्या तर त्यावर परखड मतेही व्यक्त करतात. दिग्पाल लांजेकर यांनी यापूर्वी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवाजी हे चित्रपट यशस्वीपणे दिग्दर्शित केले. आता ते सुभेदार या नव्या चित्रपटासह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे नवे पोस्टर त्यांनी लॉन्च केलंय.
ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी सुभेदार चित्रपटाचे नवीन पोस्टर ट्विटरवर पोस्ट केलंय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'सुभेदार हा मराठी चित्रपट २५ ऑग्स्ट रोजी रिलीज होणार आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवाजी या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले आहे. एए फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट सादर करत असलेला सुभेदार चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सुभेदार चित्रपट प्रद्योत प्रशांत पेंढारकर, अनिल वार्खडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, विनोद निशीद जवळकर, शिवभक्त अनिकेत निशीद जवळकर आणि श्रृती दौंड यांनी संयुक्तपणे निर्माण केला आहे'.
सुभेदार या चित्रपटात सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या अद्वितीय पराक्रमाची गोष्ट दाखवली जाणार आहे. मराठी इतिहासामध्ये तान्हाजींचे शौर्य नेहमी उदाहरण म्हणून दिले जाते. कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यातून स्वराज्यात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तान्हाजी मालुसरे यांच्यावर जबाबदारी सोपवली. याच दरम्यान आपल्या मुलाचे लग्न टाळून त्यांनी स्वराज्यासाठी ही जबाबदारी आपल्या शीरावर घेतली आणि आपल्या बलिदानातून त्यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. या कथानकावर आधारित तान्हाजी हा चित्रपट दिग्दर्शक ओम राऊतने बनवला होता. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केलेल्या या चित्रपटाने तान्हाजी मालुसरेंचा पराक्रम भारतासह जगासमोर आणला होता. आता पुन्हा एकदा हीच कथा सुभेदार चित्रपटाच्या माध्यमातून दिग्पाल मांडणार आहे.