मुंबई - Namrata Yogesh Sambherao :नम्रता संभेराव ही एक अभिनेत्री आहे जी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आली. तिनं आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता तिनं नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा मुलगा रुद्रराज दिसत आहे. व्हिडिओमध्ये रुद्रराजनं मराठीचं महत्त्व सांगितलं आहे. नम्रता ही व्हिडिओमध्ये आपल्या मुलासोबत बसलेली दिसत आहे. रुद्रराज आपल्या आईला मराठी भाषेचं महत्व सांगत म्हणतो, 'आई ही अमेरिका नाही इंडिया आहे. इंडियात सगळे मराठीच बोलतात. तू इंडियात इंग्लिश बोलते? इंग्लिश नाही बोलायचं मराठीच बोलायचं' असं तो तिला सांगत आहे.
नम्रता संभेरावनं केला व्हिडिओ पोस्ट :शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नम्रता संभेराव इंग्रजीत बोलताना दिसत आहे. नम्रताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. नम्रतानं व्हिडिओ शेअर करत म्हटलं, 'माझ्या बाळाची मराठीबद्दलची ओढ आणि प्रेम पाहून मला खूप अभिमान वाटत आहे. खेदाची गोष्ट म्हणजे मराठी माध्यम लोप पावत आहेत. ह्याची खूप खंत वाटते आमच्या आसपास मराठी माध्यम नाही ही वाईट परिस्थिती आहे, असं नम्रतानं या व्हिडिओला कॅप्शन देत सांगितलं आहे. नम्रताचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत रुद्रराजचे कौतुक करत आहेत. याशिवाय अनेकजण मराठी भाषेविषयी अभिमान असल्याचं सांगत आहेत.