मुंबई- नाळ या २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याचे स्पष्ट संकेत चित्रपटाचा निर्माता नागराज मंजुळेने दिले आहेत. नाळ हा चित्रपट सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला होता व याची निर्मिती नागराज मंजुळे यांची होती. ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा २०१९ मध्ये या चित्रपटाचा दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणचा चित्रपट म्हणून गौरव करण्यात आला होता.
या चित्रपटाचा आता सिक्वेल बनणार आहे. नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ''मागच्या महिन्यात सुधाकरने ( Sudhakar Yakkanti ) अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकायला कधी भेटुयात? नाळचा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. पहिल्या "नाळ" प्रमाणेच 'नाळ'चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे ! "नाळ 2" नावानं चांगभलं !!!
नाळ चित्रपटाची कथा - चैत्या (श्रीनिवास पोकळे) एका छोट्या गावात आई (देविका दफ्तरदार) वडील (नागराज मंजुळे) आणि आजी सोबत राहत असतो. तो आई, वडील, आजी यांचा प्रचंड लाडका असतो. त्याचे कुटुंब हेच त्याचे जग असते. गावातल्या मुलांसोबत मस्ती करणे, नदीत खेळणे ही त्याची आवडती कामे आहेत. पण एक दिवस त्याच्या घरी त्याचा एक मामा (ओम भुतकर) येतो. या मामला त्याने कधीच पाहिलेले नसते. या मामाकडून त्याला कळते की, त्याचे आई वडील हे त्याचे खरे पालक नसून त्यांनी त्याला दत्तक घेतले आहे, हे कळल्यावर त्या चिमुकल्याच्या मनाची काय घालमेल होते हे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी खूप छान प्रकारे मांडले आहे.